छत्रपती संभाजीनगर – दोन वर्षांपूर्वी किराडपुरा श्रीराम मंदिर परिसरात श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला उसळलेल्या दंगलीची घटना घडली होती. या अलीकडच्या काळातील घटनेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ६ एप्रिल रोजीची श्रीराम नवमी व येत्या शनिवारच्या हनुमान जयंतीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयांतर्गत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव दरम्यान विशेष कृती दल, विशेष स्वतंत्र मार्शल गस्त पथक, राज्य राखीव दल कंपनी, दंगा काबु पथक, गणवेशातील व साध्या वेशातील पोलिसांव्दारे विशेष गस्त, संवेदनशील ठिकाणी फिक्स पाँईट, गल्ली बोळात गस्त, ड्रोन पेट्रोलिंग, तसेच ३ पोलीस उपायुक्त, ७ सहायक पोलीस आयुक्त, २७ पोलीस निरीक्षक, ९१ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, अंमलदार १ हजार १५७, महिला अंमलदार १२७ असा चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. जिन्सी, सिटी चौक, सिडको, क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. शहरामध्ये ३६ मिरवणुका निघणार असून मिरवणूक मार्गावर योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे, अशी माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली.
दोन्ही उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी शहरातील प्रमुख मंदिरांचे पदाधिकारी, मस्जीद व ईदगाहचे मौलाना, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती. अफवा पसरवणारे व सोशल मीडियाव्दारे सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी, असे आवाहन करण्यात आले.