छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेमुळे आलेला अर्थसंकल्पावरील ताण एवढा वाढला आहे की आत्महत्याग्रसत शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायच्या एक रुपयांचे दोन कोटी ३९ लाख रुपयांची मागणी शासनाकडे वारंवार करावी लागत आहे. मराठवाड्यातील २३९ शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत निधी अभावी रखडली आहे.

मराठवाड्यात १०३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यातील ८२३ शेतकरी एक लाख रुपयांच्या मदतीस पात्र असल्याचे अहवाल जिल्हा स्तरीय समित्यांनी मंजूर केले. आतार्यंत ४८६ शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तीन कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची गरज होती. त्यापैकी काही निधी मिळाला. मात्र अजून २३९ शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही.

एकूण मदतीतील केवळ ३५ हजार रुपयेच रोख मदत मिळते. उर्वरित मदत वारसाच्या नावाने अनामत म्हणून दिली जाते. अनेक जिल्ह्यात मदतीसाठी मृत शेतकऱ्यांचे नातेवाईक तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंंत चकरा मारत आहेत. मदतीसाठी आवश्यक निधीची मागणी केली आहे. ही मदत आली की वितरित केली जाईल असे अधिकारी सांगत आहेत.