छत्रपती संभाजीनगर: गंगापूर शहरासह लासूर स्टेशन व परिसरातील कृषी केंद्रांमध्ये बनावट कापसाच्या बियाण्यांची बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ नग बोगस व अनधिकृत कापूस बियाणाचे पाकिटे गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून कृषी अधिकारी अजय गवळी यांच्या फिर्यादीवरून विविध २४ कलमान्वये चार आरोपींविरोधात बनावट कापूस बियाण्याची विक्री तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : मराठवाड्यात सात दिवसांत पावसामुळे आठ जणांचा मृत्यू; सर्वाधिक चार मृत्यू लातूरमध्ये
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी बापुराव जायभाये व कृषी अधिकारी (पंचायत समिती) अजय गवळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ६ जून रोजी लासूर नाका येथे एक कारवाई केली. बोगस व अनधिकृत कापूस बियाणे पुरवठा व विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी येणार असल्याची माहिती त्यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्याआधआरे पथकाने सापळा रचला संजरपूर (ता. गंगापूर) येथील संशयित आकाश अप्पासाहेब सुकाशे याला व अन्य एकाला संशयित, बोगस व अनधिकृत कापूस बियाणेचे ०२ पाकीटे विक्री करीत असतांना पंचासमक्ष पकडण्यात आले.