छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईमध्येही मद्यानिर्मिती उद्याोगांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाचा मुद्दा कायमच चर्चेत राहिला… यावर तोडगा काढण्यासाठी जलव्यवस्थापन आणि कार्यपद्धतीत केलेल्या बदलांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. आता एक लिटर बिअरनिर्मितीसाठी आठ लिटरऐवजी केवळ साडेतीन लिटरच पाणी वापरावे लागत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून गेल्या तीन वर्षांतील बिअर आणि विदेशी मद्याच्या उत्पादनाचे आकडे आणि महाराष्ट्र राज्य औद्याोगिक विकास मंडळाकडून (एमआयडीसी) कंपन्यांना पुरवठा केला जाणारे पाणी याची आकडेवारी तपासली असता बिअर कंपन्याचा सरासरी पाणीवापर कमी झाल्याचे दिसून येते. उत्पादन आणि पाणी वापराच्या गणितात झालेली ही घट मोठी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. ‘कार्ल्सबर्ग’ या बिअर कंपनीची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. २०२२-२३मध्ये एक कोटी ९५ लाख ७७ हजार लिटर पाणी वापरून ९१ लाख ३९१९७ लिटर (प्रतिलिटर ५.३ लिटर) बिअर निर्मिती झाली. तर २०२४-२५मध्ये एक कोटी ९५ लाख ६१ हजार लिटर पाण्यातून ९३ लाख २३ हजार ४०६ लिटर (प्रतिलिटर ४.७ लिटर) उत्पादन झाले. कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याचशा पाण्याचा वापर हा परत आलेल्या रिकाम्या बाटल्या धुण्यासाठी केला जातो. या प्रक्रियेत पाणी कमी आणि हवेचा मारा अधिक अशी रचना करण्यात आली आहे. शिवाय किन्वण करणाऱ्या यंत्रणाही बदलण्यात आल्या आहेत.
कंपन्यांना एमआयडीसीकडून बिअरसाठी ४९.५० रुपये तर विदेशी मद्यासाठी ४२.५० प्रति घनमीटर दराने पाणी पुरवठा होतो. पाण्याची किंमत वाढल्यामुळे कंपन्यांनी वापरात काटकसर सुरू केल्यामुळे पाण्याची बचत होऊ लागल्याचे सांगितले जाते. काही कंपन्यांच्या पाणी वापरामध्ये घट झाल्याचे दिसून येत असले तरी त्याची निश्चित कारणे सांगता येणार नाहीत, असे एमआयडीसीतील कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी म्हणाले.
उपाययोजना
●बाटल्या धुण्यासाठी वापरले जाणारी नळांची तोंडे निमुळती करण्यात आली आहेत.
●‘नोजल’मध्ये हवेचे प्रमाण जास्त आणि पाणी कमी अशी कार्यपद्धती स्वीकारण्यात आली आहे.
●कमी पाण्यात किन्वण प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा उभ्या केल्या गेल्या आहेत.
सुरुवातीला एक लिटर बिअरसाठी १६ लिटर पाणी लागत असे. त्यात गेल्या काही वर्षांत ५० टक्के बचत केली जाऊ लागली होती. आता बऱ्याच तांत्रिक सुधारणा केल्यामुळे सरासरी साडेतीन लिटर पाण्यामध्ये एका लिटर बिअर उत्पन्न होते. – राम भोगले, उद्याोजक व औद्याोगिक संघटनांचे प्रतिनिधी