छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर सेफ्टीक टँक मुक्त करण्याचे धोरण राबविले जात असून, सर्वच भागात ड्रेनेज प्रकल्पाची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना १० टक्के मलजलनिस्सारण कर भरावा लागणार आहे. आता ३६५ रुपयांचा जलनिस्सारण कराचा बोजा टाकला जाणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून जलनिस्सारण कर लागू केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण शहर सेफ्टीक टँकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने विधानसभा क्षेत्रनिहाय भूमिगत गटार प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारच्या अमृत-२ मधून सातारा-देवळाईसाठी २७५ कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मिटमिटा-पडेगावसाठी १९० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविला जात आहे. तसेच मध्य आणि पूर्व विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून १८७ कोटी आणि २३५ कोटी रुपयांचे ड्रेनेज प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. एकूण ८८७ कोटी रुपयांचे हे प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी मनपाला स्वहिस्सा म्हणून २६५ कोटी रुपये भरावे लागणार आहे. त्यासाठी मलजलनिस्सारण कराची आकारणी करावी लागणार आहे.
सामान्य कराच्या रकमेवर या कराची आकारणी केली जाणार आहे. जलनिस्सारण कर १० टक्के आकारला जात असून, नवीन वर्षापासून जलनिस्सारण लाभ कर म्हणून मालमत्ताधारकांकडून ३६५ रुपये वसूल केले जाणार आहे. या जलनिस्सारण कराचा मालमत्ता करामध्ये समावेश असणार आहे. व्यावसायिकांसाठी १५ टक्के कराची आकारणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोलीनास इंटिग्रेटी कंपनी मोफत सर्वेक्षण करणार
महापालिकेने सोलीनास इंटिग्रेट कंपनीकडे ड्रेनेजचे काम सोपवले आहे. या कंपनीने शहरातील ड्रेनेजलाइन, मेनहोल, स्लोप, खोली, पाईपची अवस्था, रस्त्याखाली दबले गेलेले पाईप यांचे जीआयएस मॅपिंग करून मोफत सर्वेक्षण करण्यासाठी पत्र दिले असून, कंपनीनेदेखील तयारी दर्शवली आहे.