लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथे शुक्रवारी एका मुलीचा बालविवाह बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने रोखला.

या संदर्भातील माहिती मिळताच तात्काळ संबंधित बालकल्याण विकासचे अधिकारी सिल्लोड ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन मंगरूळ येथील विवाहस्थळी पोहोचले. बालिकेच्या वयाच्या पुराव्यासाठी कागदपत्राची मागणी केली असता, सध्या आमच्याकडे बालिकेचे कागदपत्रे आधारकार्ड उपलब्ध आहे व सध्या तिचे वय १६ वर्षे ०७ महिने असल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे संबंधित बालविवाहातील बालिका, तिचे पालक तसेच वर मुलगा, त्याचे पालक व इतर नातेवाईक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ या कायद्या विषयी माहिती सांगून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

आणखी वाचा-बीडमधील राजस्थानी-ज्ञानराधाच्या संचालकांवर छत्रपती संभाजीनगरमध्येही फसवणुकीचा गुन्हा दाखल

संबंधीत बालिकेचे वय १८ वर्षे पूर्ण होण्याअगोदर विवाह न करण्यासंदर्भात त्यांच्याकडून लेखी जबाब (बंधपत्र) घेण्यात आले. त्यांना १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बाल कल्याण समिती समोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान सिल्लोड पोलिस ठाण्याचे संजय आगे, राजू काकडे, महिला बालविकास अधिकारी नितेश धुर्वे, पर्यवेक्षक यशवंत इंगोले व मंगरूळचे ग्रामसेवक बोर्डे आदींची उपस्थिती होती.

Story img Loader