बिपीन देशपांडे लोकसत्ता
औरंगाबाद : मशिदीवरील भोंगे, हलाल, हिजाब असे वाद घडत असताना औरंगाबाद शहरातील अकरा मशिदींमध्ये बालवाचनालय सुरू करण्यात आले आहेत. रमजान महिन्यातील या उपक्रमामुळे सफरद हाशमी यांची ‘किताबे करती हैं बाते’ ही कविता औरंगाबादमध्ये पुढे सरकताना दिसू लागली आहे. ११ मशिदींमधील प्रतिसाद पाहून कामाची व्याप्ती वाढवायचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ‘रीड अॅण्ड लीड’ फाउंडेशनमधील या अभियानाचे प्रमुख मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी सांगितले.
बालवाचनालयात मुलांसाठी नि:शुल्क सदस्यता नोंदणी आहे. आता घर-घर किताब, हे अभियानही राबवणयात येणार आहे. या वाचनालयातील फातिमा सांगते, ‘पुस्तकांमधील गोष्टी आवडतात. आता वाचल्यानंतर पटतंय.’ फातिमा नियमितपणे जवळच्या मशिदीमध्ये जाते आणि अटीनुसार पुस्तक घरी येऊन येते. फातिमाकडे आता मराठी, इंग्रजी आणि उर्दूचेही एक पुस्तक असते. वाचलेल्या पुस्तकातील भावलेला मजकूर एका अर्जावर लिहून पुन्हा मौलवींकडे ती सुपूर्द करते.
या ग्रंथालयात मराठी, हिंदी व उर्दूसह सामान्यज्ञान-विज्ञान, व्यक्तिविशेष, कथा-कवितांसह, कार्टून, अशा शंभर प्रकारातील ही पुस्तके असून वाचनासाठी मशिदीमध्ये येणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. या अभियानचे प्रमुख मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी सांगतात, की घरात आज सर्व काही येत आहे. पण पुस्तके येत नाहीत. त्यामुळे मुलांना आम्ही घरीच पुस्तक घेऊन जायचे आणि वाचून आणून द्यायचे, अशी अट घातलेली आहे. घरी पुस्तक नेले आणि चार दिवस ठेवून आणले, असे होणार नाही, याचीही काळजी म्हणून एक स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी अर्ज भरून घेतला जातो. सायकल, बॅगसारखी बक्षिसेही दिली जातात. त्यामुळे मुले आवडीने पुस्तके वाचू लागली आहेत. मोबाइल फोनपासून काही वेळ का होईना दूर होत आहेत, याचे समाधान आहे. तर मुलांसोबत पालकही पुस्तकांमध्ये रमत आहेत.
मशिदींमध्ये ग्रंथालय सुरू केलेले आहे. खरं तर हे काम आम्ही फार पूर्वीच करायला हवे होते. पण ठीक आहे. देर आये, दुरुस्त आहे, अशातला प्रकार आहे. मुलांचा ग्रंथालय अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मोबाइल फोनवरील वाचन आणि पुस्तकातले वाचन यात मोठा फरक असल्याचे आता मुलांनाही जाणवत आहे. मस्जीदमधील पुस्तकांच्या प्रकारात विविधता आहे.
– मौलाना शेख युसूफ नदवी, बेरी बाग हर्सूल.
पुस्तके मशिदीमध्ये ठेवल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देणारा आहे. शालेय अभ्यासात कामी येणाऱ्या ज्ञानासह इतरही अनेक विषयांचा अभ्यास होईल, अशी विविध प्रकारातली पुस्तके मस्जीदमधील ग्रंथालयात पाहायला मिळतात. मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे मुले न घाबरता प्रश्नही विचारू लागले आहेत.
– सालेह चाऊस, प्रबंधक, मस्जीद दारेअरकम, मिसारवाडी.