भावाविरुद्ध अनधिकृत नळजोडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतील समन्वयक सुबोध सुबराव बोबडे यास ८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. महापालिकेतील निवृत्तिवेतन कक्षात पंचासमक्ष सकाळी अकराच्या सुमारास त्याने लाचेची मागणी केली. या प्रकारामुळे पाणी न देता कंपनीतील अधिकारी सर्वसामान्याना कसे त्रास देतात हे उघड झाले आहे.
शहरातील डी.के.एम.एम. महाविद्यालयासमोरील संभाजीनगर भागात केलेल्या बांधकामावर फिर्यादीच्या भावाने नळजोडणी घेण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदाराचा भाऊ गावी शेती करीत असल्याने नळजोडणीचा पाठपुरवा करणाऱ्या ग्राहकास समन्वयक सुबोध बोबडे याने ‘आधी नळ जोडणी घ्या, नंतर प्रक्रिया करू’, असे सांगितले. मात्र, नंतर जोडणी वैध करावी करावी, अशी विनंती केल्यानंतर जोडणी अनधिकृत आहे, गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.
समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी नेमलेला समन्वयक बोबडे यांनी लाचेची मागणी केल्यानंतर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. लाच मागणीची खात्री केल्यानंतर सकाळी ११ वाजता सापळा रचून पोलिसांनी बोबडे यास अटक केली. औरंगाबाद परिक्षेत्राचे डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदशानाखाली ही कारवाई करण्यात आली. सिटी पोलीस ठाण्यात या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला.