प्रत्येक संवर्गाची अंतिम ज्येष्ठ सूची प्रसिद्ध करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाईल, या बाबीला अधीन राहून सध्या उपलब्ध तात्पुरत्या अंतिम ज्येष्ठता सूचीच्या आधारे तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी ते निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी, तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी ते निवड श्रेणी अतिरिक्त जिल्हाधिकारी या संवर्गातील प्रस्ताव तात्काळ पदोन्नतीसमोर सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी १६ नोव्हेंबरला दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लवकरच पदोन्नत्यांचा प्रदीर्घ काळ रखडलेला विषय लवकर मार्गी लागून पात्रताधारकांना युती सरकारकडून दिवाळी भेट मिळेल, या मनोभूमिकेत महसूल विभाग आहे.
मागील अनेक वर्षांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नत्यांचा विषय रखडला. या बाबत या संवर्गात प्रचंड नाराजी आहे. एकीकडे सेवानिवृत्तीचे वय जवळ येत चालले असताना पदोन्नतीच्या दृष्टीने काहीही हालचाली होत नसल्याने त्यांच्यात निराशेची भावना आहे. दरम्यान, गेल्या मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पदोन्नतीचा विषय हिवाळी अधिवेशनापर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी १६ मार्चला विधानभवन समिती कक्षात घेतलेल्या बैठकीत जात पडताळणीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) संवर्गातील अधिकारी दोन महिन्यांत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते; परंतु तरीही हालचाली होत नव्हत्या.
विधानसभेच्या अध्यक्षांनी महसूलमंत्र्यांना पत्र लिहून हा विषय पूर्ण करण्याची सूचना केली होती. त्यानंतर २० ऑक्टोबरला त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊनसुद्धा अस्तित्वात असलेल्या ज्येष्ठता सूचीच्या आधारे तर्द पदोन्नती एका महिन्यात देण्याचा निर्णय घेतला गेला. या पाश्र्वभूमीवर महसूलमंत्र्यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना निर्देश दिले. त्यानुसार महसूल विभागाने तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील ज्येष्ठता सूची अद्ययावत करण्याबाबत महसूलमंत्री कार्यालयाकडे सूचना व शिफारशींसह काही प्रकरणे सादर करताना ज्येष्ठता सूची अंतिम करण्याबाबत कळविले.
दरम्यान, या प्रक्रियेला काही कालावधी लागणार असल्याचे नमूद करीत प्रत्येक संवर्गाची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाईल, असे सांगितले जात आहे.

Story img Loader