भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे या समीकरणामुळे मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री यांनी गडाची कन्या जाहीर करून त्यांच्या नेतृत्वालाही शक्ती दिली. पण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील दगडफेकीनंतर महंत शास्त्री यांचे पुतळे जाळल्याने ‘गड’ मुंडे कुटुंबातील ‘राजकीय संघर्षांच्या’ वादात आला. या पाश्र्वभूमीवर महंत नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथगडाच्या निर्मितीमुळे भगवानगडाचा श्वास मोकळा झाला असून भगवानगड श्रद्धेचा तर गोपीनाथगड राजकीय असेल. यापुढे पंकजा मुंडेंचे राजकीय भाष्य गोपीनाथगडावरूनच होईल, असे स्पष्ट केले. तर भगवानगडावर येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्याची भूमिका जाहीर केल्याने धनंजय मुंडे यांचा गडावर जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
बीड जिल्ह्यात संत नारायण महाराज यांनी पहिल्यांदा नारायणगडाची स्थापना केल्यानंतर संत भगवानबाबा यांनी भगवानगडाची स्थापना केली. त्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अध्यात्म आणि भक्ती प्रसारासाठी संत-महंतांनी गडांची निर्मिती केली असल्याने गड महंतांच्या शब्दाला प्रमाण मानणारा भक्तवर्गही मोठय़ा संख्येने निर्माण झाला. संत भगवानबाबा यांनी भगवानगडावर दरवर्षी दसऱ्या मेळाव्याची सुरुवात केल्याने लाखो भक्त जमा होण्याची परंपरा सुरू झाली. याच दसऱ्या मेळाव्याला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे २५ वषार्ंपासून हजेरी लावत. दसरा मेळाव्यातून मुंडे राजकीय भूमिका जाहीर करत असल्याने गडाला राजकीयदृष्टय़ाही महत्त्व आले. गडावरून मला दिल्ली दिसते, गडावरून मला मुंबई दिसते, या मुंडेंच्या विधानाची राज्यभर आणि पुढे देशभर चर्चा झाली. अध्यात्म आणि राजकारण याची योग्य सांगड घालून मुंडे यांनी समाजाची वज्रमुठ बांधल्याने गड आणि मुंडे हे समीकरण रुढ झाले. परिणामी मुंडेंना विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांना गडावर मज्जाव केला गेला. सुरुवातीला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे त्यानंतर फुलचंद कराड यांनाही गडावर भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. वर्षभरापूर्वी केंद्रात ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीनाथ मुंडे थेट भगवानगडावर आले आणि गडावरून बोलताना मला आता ‘पंकजा दिसते’ असे सांगत आपला राजकीय वारस पंकजा असल्याचे जाहीर केले आणि दोनच दिवसांत त्यांचे अपघाती निधन झाले. मुंडे यांच्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना ‘गडाची कन्या’ जाहीर करून पंकजा यांच्या नेतृत्वाला शक्ती दिली.
दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाली आणि धनंजय यांनीही काकाप्रमाणेच आपल्या नव्या राजकीय प्रवासाला भगवानगडाचे दर्शन घेऊन सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण मुंडे कुटुंबातील बहीण-भावाच्या राजकीय संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर भगवानगडावर धनंजय मुंडे यांच्या गाडय़ांवर दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी महंत नामदेव शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांचे पुतळेही जाळले आणि भगवानगड मुंडे कुटुंबातील राजकीय संघर्षांच्या वादात आला. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पंकजा मुंडे यांनी परळी येथे गोपीनाथगड उभारण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी गडाच्या भूमिपूजनप्रसंगी गोपीनाथगड हा राजकीय असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर शनिवारी झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात महंत शास्त्री यांनी मुंडे कुटुंबातील सत्तासंघर्षांच्या वादातून भगवानगडाला दूर केले. यापुढे गोपीनाथगडावरूनच पंकजा मुंडे यांचे राजकीय भाष्य होईल. भगवानगड हा श्रद्धेचाच गड राहील. पंढरपूर, आळंदीप्रमाणे याठिकाणी येईल त्या प्रत्येकाचा सन्मान केला जाईल, असे सांगत कोणावरही दगड पडणार नाहीत असा संदर्भही त्यांनी दिला. तर परळी-अंबाजोगाई-गंगाखेड या परिसरातील लोकांनी भगवानगडाला कोणतीही मदत केली नाही. आता गोपीनाथगडाला मदत करा आणि पंकजाला साथ द्या, असे आवाहन केले. महंत शास्त्री यांच्या या भूमिकेने भगवानगडावर धनंजय मुंडेंच्याही प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा