बिपीन देशपांडे, औरंगाबाद
पाणी पिण्यासाठी अत्यावश्यक असले तरी ज्यांचे पोट पाण्यावरील व्यवसायावर अवलंबून आहे, अशा परिट व्यावसायिकांनाही दुष्काळाचा दाह सोसावा लागत आहे. औरंगाबादेत एकच असलेल्या धोबीघाटवर एक दिवस आड पाणी असून घर व परिसरात कपडे धुणाऱ्यांना टँकर मागवण्याशिवाय पर्याय उरला नाही. ‘विकतचे पाणी आणि दर मात्र पहिल्यावाणी’, अशी आमची स्थिती असून लग्नसराईच्या ऐन मोसमात कपडे धुण्यासाठी आले की आता धास्ती वाटत असल्याचे काही परिट व्यावसायिक सांगतात.
औरंगाबाद ही उद्योगनगरी आणि पर्यटननगरी आहे. औद्योगिक वसाहतीतील औषध निर्माणासह इतरही कंपन्यांमध्ये विशिष्ट कपडय़ांमध्ये कर्मचारी वर्गाला काम करावे लागते. याशिवाय लॉजिंगमध्ये बेडशिट, टॉवेल, उशांचे खोळ रोज स्वच्छ ठेवावे लागतात. असेच काम रुग्णालयांमध्येही चालते. रुग्णांचे कपडे, परिचारिक-परिचारिका व डॉक्टरांचे कपडे हे दररोजच बदलावे लागतात. त्यांचे धुणे हे परिट व्यावसायिकांकडचे नित्याचे काम. बारा महिने हे काम सुरूच असते. उन्हाळा किंवा लग्नसराईच्या काळात घरगुती ग्राहकाच्या कपडे धुण्याच्या कामाची भर पडते. त्यातून चांगला व्यवसाय होतो. मात्र आता दुष्काळी परिस्थितीमुळे या अधिकच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागत आहे. कपडे धुण्यासाठी टँकरशिवाय पर्याय नाही, असे व्यावसायिक सांगतात.
परिट व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोरुडे म्हणाले, ‘‘औरंगाबादेत सद्यस्थितीत एकच धोबीघाट आहे तो मुख्य बसस्थानकामागे. इतर ठिकाणचे दोन धोबीघाट कालौघात बंद पडले.
आता आहे तेथे सध्या तरी पाण्याची फारशी समस्या नाही. मात्र, आमच्यासारखे घरगुती व्यावसायिक आहेत, त्यांना टँकरच्या पाण्यावरच कपडे धुवावे लागतात. दोन ते तीन दिवसाला एक टँकर मागवावे लागते. दर मात्र पूर्वीचेच आकारले जातात. दोन हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरमागे पाचशे रुपये मोजावे लागतात. त्यात लॉजिंगचे टॉवेल आदी काही कपडय़ांना बरेच पाणी लागते.’’
अधिकच्या कपडय़ांची धास्ती वाटते
कपडे धुण्याचा, इस्त्रीचा व्यवसाय करणारा प्रीतम मधीकर सांगतो की, ‘‘मी ज्या सिडको भागात राहतो तिथे पाच-सहा दिवसाला एकदा पाणी येते. घरच्या वापरालाच अधिक लागते. व्यवसायासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. तातडीने कपडे हवे असणाऱ्या ग्राहकाला थेट नकार द्यावा लागतो. अधिकचे कपडे धुण्यासाठी आले तर पूर्वी आनंद वाटायचा. आता मात्र धास्ती वाटते.