पोळ्याला पावसाची दिशा बदलते. त्यामुळेच ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ असे म्हटले जाते. तथापि पाऊसच गायब झाल्याने त्याची दिशा बदलण्याचा प्रश्नच नाही. परिणामी कृषी संस्कृतीतला महत्त्वाचा सण असलेल्या पोळ्यावर दुष्काळाचे ढग आहेत.
पोळा हा कृषी संस्कृतीतला महत्त्वाचा सण. या दिवशी बलांची पूजा केली जाते. वर्षभर ज्यांच्या मानेवर जू आहे, त्यांचे खांदे मळले जातात. स्वच्छ धुवून आंघोळ घातली जाते. साजही चढवला जातो. यंदा मात्र पोळ्याच्या सणावर दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या कोणतेच समाधान दिसत नाही. श्रावणातील हा शेवटचा दिवस असल्याने श्रावणातल्या नसíगक रंगरूपाची उधळण नेहमीच पोळ्याच्या पाश्र्वभूमीवर जाणवते. या वेळी मात्र दुष्काळाचे सावट पोळ्यावर आहे. परिणामी पोळ्याचा बाजार करण्यासाठीही शेतकऱ्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या. पाऊसच नसल्याने यंदाचा पोळा कोरडाच जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाने ताण दिल्यास किमान पोळ्याच्या दिवशी तरी पाऊस येतो, अशी श्रद्धा ग्रामीण भागात आहे. बलांची पाठ भिजवण्यासाठी का होईना पण पावसाची हजेरी होतेच, असे खेडय़ा-पाडय़ात मानले जाते. त्यामुळे उद्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा आहे. चालू आठवडय़ाच्या सुरुवातीला पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावली. जिल्हाभरात पाऊसही झाला. काही ठिकाणी पाणी वाहताना दिसले. पोळ्याच्या दिवशी बलांना धुण्यासाठी तरी पाणी मिळते की नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, आठवडय़ात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने काही भागात ही चिंता दूर केली. यंदा पहिल्यांदाच पावसाचे पाणी वाहताना दिसले. काही ठिकाणी पाणी साचल्याच्या खाणाखुणाही दिसत आहेत. त्यामुळे बल धुण्यासाठी काही गावात पाणी उपलब्ध झाले असले, तरी अनेक ठिकाणी पाण्याचे दुíभक्ष्य मोठय़ा प्रमाणावर आहे.
श्रावण महिना संपता संपता जे सणवार सुरू होतात ते पुढे दसरा-दिवाळीपर्यंत चालू असतात. खरीप हंगामात तीन महिन्यांच्या आत येणाऱ्या मूग, उडीद, सोयाबीनसारख्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त असते. ताणलेला हात मोकळा होण्यासाठी ही पिके हातभार लावतात. त्यामुळे पोळा, महालक्ष्मीसारख्या सणांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती या पिकांचा पसा येतो. यंदा खरीप हंगामाचीच वाट लागल्याने आता सणवार कोणत्या भरवशावर करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कोणतेही पीक घरात आले नसताना शेतकरी यंदा पोळ्याच्या सणाला सामोरे जात आहेत. ग्रामीण भागात पूर्णपणे दुष्काळी वातावरण असल्याने पोळा या सणाची रयाच निघून गेली आहे.
पोळ्याच्या पाश्र्वभूमीवर पाऊस आपली दिशा बदलतो. याच दिवसांत पावसाची अनिश्चितताही मोठय़ा प्रमाणात असते. श्रावणातल्या ऊन-सावलीच्या लपंडावाप्रमाणे या दिवसांतला पाऊसही बेभरवशाचा असतो. तो बलाच्या एका िशगावर पडला, तर दुसऱ्या िशगावर कदाचित पडणारही नाही, एवढी अनिश्चितता या पावसाची असल्याचे जुने संकेत बोलले जातात. या वेळी पावसाने मोठा ताण दिल्याने पोळा सण कसा साजरा करायचा, या विवंचनेत शेतकरी आहे. पाऊसच गायब झाल्याने कुठेही गवत उगवलेले दिसत नाही. परिणामी साठवून ठेवलेला चारा आताच बलांसाठी वापरला जात आहे. पावसाळ्यात गवत खायला मिळते. त्यामुळे बलांसाठी कडबा तसाच राखून ठेवला जातो, पण आता शिवारात गवतच नसल्याने कडब्यावरच बलांची गुजराण होत आहे.
एकीकडे पाऊस नसल्याने आटलेले जलसाठे, दुसरीकडे बांधावर न उगवलेले गवत, खरिपातल्या नगदी पिकांनी केलेली निराशा आणि पावसाने दिलेला दगा या पाश्र्वभूमीवर यंदाचा पोळा हा सण शेतकरी जडावलेल्या अंतकरणानेच साजरा करतील, अशी परिस्थिती आहे.
बैलपोळ्यावर दुष्काळाचे ढग
पोळ्याला पावसाची दिशा बदलते. त्यामुळेच ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ असे म्हटले जाते.
Written by बबन मिंडे
First published on: 12-09-2015 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloud of drought on bail pola