मागील चार दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू आहे. एमपीएससीचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान, यासंदर्भात काल माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी लोकसेवा आयोग बोलण्याची ऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीकाही केली. या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तरांप्रमाणे हिंमत दाखवावी, ५६ इंचांची छाती काय…” ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा!

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

“एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना मी अनावधानाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. दिवसभर कोर्टकचेरी, निवडणूक आयोगाच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळे चुकून माझ्या तोंडून निवडणूक आयोग असा शब्द निघाला”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

“विद्यार्थ्यांची जी भूमिका तीच सरकारची भूमिका”

“विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी एमपीएसीला दोनवेळा पत्र लिहिले आहे. एमपीएससीचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत आम्ही मंत्रीमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेतला आहे. जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे, तीच सरकारचीही भूमिका आहे. मी पुन्हा यासंदर्भात आयोगाशी बोलणार असून याबाबत लवकरच निर्णय होईल”, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?

वृत्तावाहिनींच्या प्रतिनिधींशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला होता. “एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. २०२५ पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत सरकार सहमत असून निवडणूक आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे”, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – विश्लेषण : ‘एमपीएससी’ परीक्षार्थींचे म्हणणे नेमके काय? या वादाआडून राजकारण होत आहे का?

राष्ट्रवादीकडून खोचक टीका

मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली होती. “यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…”, असं ट्वीट राष्ट्रवादीने केलं होतं.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde clarification on statement regarding mpsc as election commission spb