औरंगाबाद – देशाला अहिंसक लढ्याने स्वातंत्र्य मिळाले. पण, हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी सशस्त्र लढा द्यावा लागला. हा रक्तरंजित लढा इतिहासाचे सुवर्णपान आहे. या लढ्याची माहिती जगभरात पोहचवणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विभागीय परिषदेत केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृतमहोत्सव समितीच्या वतीने विभागीय परिषद घेण्यात आली. तापडिया नाट्यमंदिर येथे झालेल्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रदिप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार अभिमन्यू पवार, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, संयोजक ॲड. जी. आर. देशमुख, भीमराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकातील जनतेने त्याग केला.
हेही वाचा >>> लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा पार पडला. २२५ वर्षे सत्ताधीस असलेल्या निजामाने जनतेवर अत्याचार केले होते. रझाकारांच्या राक्षसी वृत्तीचा बिमोड सशस्त्र लढ्यातून झाला’, असे शिंदे म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्पातील ७५ कोटीतून प्रस्तावित स्मारक न उभारता मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात नवीन सभागृह आणि ग्रंथालय उभारावे. दरवर्षी औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी आणि वांद्रे येथील मराठवाडा भवनची जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी संयोजक देशमुख यांनी प्रास्ताविकात केली. दरम्यान, या कार्यक्रमात गोविंद पवार काढत असलेल्या यात्रेच्या ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पवारांच्या मागण्या, शिंदे यांचे मौन
आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मागण्यांची यादी वाचली. मराठवाड्याला हक्काचे १८ टीएमसी पाणी द्या, वैधानिक विकास मंडळ सुरू करा, रस्त्यांसाठी पुरेसा निधी द्या, लातूर येथे स्वतंत्र आयुक्तालय सुरू करा, मराठवाड्याला क्रीडा विद्यापीठ द्या, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राला दस्तावेज जतनासाठी २५ लाख रुपये निधी द्या आणि पाचवी ते आठवीपर्यंत अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा समावेश करा, अशा मागण्या पवार यांनी मांडल्या. तर ‘सरकार नवीन आहे. मराठवाड्याचा अनुशेष निश्चित भरणार आहे’, असे सांगत शिंदे यांनी भाषण आटोपते घेतले. त्यामुळे मंचावरील आणि सभागृहातील अनेकांची निराशा झाली.