नाशिक जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की आगीचे लोळ दूरवरून दिसत आहे. आगीच्या या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मी घटनास्थळी जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग यांची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून, आतमध्ये अडकलेल्या लोकाचं बचावकार्य सुरु आहे. या घटनेत अकरा लोक जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सुयश रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
हेही वाचा : रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात, ठाकरे कुटुंबाच्या अडचणी वाढणार?
“कंपनीतील एका ठिकाणी अद्यापही तीन लोकं अडकले आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. तसेच, आगीवर नियंत्रणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.