गेल्या काही दिवसांपासून नीचांकी तापमानाने तळ गाठणारा पारा आजही तसाच राहिला. त्यामुळे आज दिवसभरातही थंडीची चाहूल होती. दोन दिवसांपासून थंडीत कोणताही फरक पडला नाही. भर दुपारी सुद्धा थंडी जाणवत असल्याने अद्यापही हुडहुडी कायम अशी परिस्थिती आहे. शनिवारी सकाळी ४.८ अंश तापमान होते तर रविवारी ५.५ अंश इतके होते. थंडीच्या लाटेमुळे जिल्हा गारठल्याने गरम कपडय़ाचे भाव कडाडले आहेत, तर सकाळी फिरण्यास जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
एरवी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी थंडी डिसेंबरअखेरीस दाखल झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. सकाळच्या वेळी थंड वारा वाहत असल्याने गारवा वाढला आहे. काल शनिवारी चालू वर्षांतील ४.८ अंश नीचांक तापमानाची नोंद झाली आहे. दुसऱ्या दिवशी तापमान एक अंशाने वाढले असले तरी हुडहुडी कायम होती. अनेक भागात शेकोटय़ा पेटविण्यात आल्या. चालू थंडीचा परिणाम सकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे; पण गेल्या चार दिवसांत ही संख्या घटली आहे. परभणीत विद्यापीठ, गंगाखेड रोड, पाथरी रोड व वसमत रोडवर प्रकृती स्वास्थामुळे फिरणाऱ्यांची गर्दी असते ती आता दिसत नाही.

Story img Loader