ट्रॅव्हल्स कंपनीला १० लाखांना गंडा; अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘टूर’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अद्वय हिरे यांना निवडून येता यावे, म्हणून बँकेतील सर्व संचालकांना ‘टूर’ घडवून आणण्यासाठी औरंगाबादच्या ट्रॅव्हल्स कंपनीला १० लाख २४ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दानिश टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे हिदायत खान यांनी अद्वय हिरे यांच्यासह १८जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आमदार अपूर्व हिरे व माजी मंत्री प्रशांत हिरे यांना या अनुषंगाने खुलासा करण्यास पोलिसांनी दोन दिवसांचा वेळ दिला. त्यांच्याकडून प्रतिसाद न आल्यास या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले. गेल्या वर्षी हिरे यांनी ही ‘टूर’ घडवून आणली.

नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकापूर्वी माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी त्यांचे चिरंजीव अद्वय हिरे यांची मते फुटू नयेत म्हणून मुंबई ते कोलकात्ता अशी विमानवारी घडवून आणली. यासाठी औरंगाबादच्या दानिश टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे बुकिंग करण्यात आले होते. या टूरचे बुकिंग प्रतीक काळे यांनी केली होते. प्रतीक काळे हा प्रशांत हिरे यांचा स्वीय सहायक आहे. या विमानातून शिवसेनेचे आमदार अनिल कदम, सुहास कांदे, प्रशांत हिरे यांचे मेहुणे राजेश शिंदे यांच्यासह १८जणांचा समावेश होता. ३१ मे २०१५ रोजी जेट एअरवेजच्या विमानातून हे सदस्य मुंबईहून कोलकात्याला गेले, तर २ जून २०१५ रोजी ते परतले.

ट्रॅव्हल कंपनीने तिकीट बुक केल्यानंतर १० लाख २४ हजार रुपये विमान कंपनीला भरले. हे पैसे भरण्यासाठी कंपनीच्या मालकाला नंतर कर्ज काढावे लागले. या अनुषंगाने झालेल्या ध्वनिमुद्रित केलेल्या संभाषणाची सीडी

तक्रार हिदायतखान याने पोलिसांकडे दिली आहे. या अनुषंगाने योग्य ती माहिती द्यावी, असा पत्रव्यवहार प्रशांत हिरे यांच्याकडे करण्यात आला आहे. त्यांना ते पत्र मिळाले आहे की नाही, याची खात्री आम्ही करून घेत आहोत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे बाहेती यांनी सांगितले.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint filed against nashik bank president
Show comments