छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील विस्कटलेली जातीय वीण पुन्हा नव्याने बांधता यावी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे. सद्भावना यात्रेनिमित्त बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व जाती संघटनांना पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. ‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी उभ्या केलेल्या ‘ इन्फंट इंडिया ’ या संस्थेवर सपकाळ मुक्काम करणार आहेत. एखाद्या काँग्रेस अध्यक्षाने स्वयंसेवी संस्थेत मुक्काम करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या यात्रेत शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी काम करणारे दीपक नागरगोजेसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तसेच मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी या सद्भावना यात्रेत सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. हा पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे फक्त तिरंगी झेंड्यासह मान्यवर मंडळी यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत १०० हून अधिक गायींचा सांभाळ करणाऱ्या शब्बीर मामू यांनाही आवर्जून बोलावण्यात आले आहे.

८ मार्च रोजी ही पदयात्रा काढण्यात येणार असून हर्षवर्धन सपकाळ भगवान गड आणि नारायण गड या दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. बीड जिल्ह्यात विविध कारणांमुळे निर्माण झालेली जातीय दुफळी कमी व्हावी असे प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर अडनावाने हाक न मारण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला आहे. पोलीस ठाण्यातही आता अडनावाच्या पाट्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर सुरू असणाऱ्या या प्रयत्नांबरोबरच पहिल्यांदाच राजकीय पक्षातील कोणी तरी या कामात पुढाकार घेतला आहे. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आखलेल्या या पदयात्रेसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी जिल्ह्यातील दोन्ही समाजांतील प्रमुख व्यक्तींनी या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीगत गाठीभेटी घेतल्या आहेत. ४६ किलोमीटरच्या या पदयात्रेचा समारोप बीड शहरात होणार असून तेथे एक सभाही घेतली जाणार आहे. या पदयात्रेचे प्रमुख राजेंद्र राख म्हणाले, ‘समाज जात असली तरी सरसकट सगळी माणसं जातीयवादी नसतात. सद्भावना निर्माण करायची असल्याने सर्व स्तरातील व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांना यात्रेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. ’

मस्साजाेगमध्ये २६ जानेवारी राेजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावणारे दत्ता बारगजे म्हणाले, ‘ जातीय तणाव कमी व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी कोणी तरी पुढाकार घेत आहे, ही चांगली बाब आहे. त्यामुळे आम्ही या यात्रेत सहभागी होऊ. सध्या बाहेरगावी आहे. या यात्रेचा हेतू चांगला आहे.’

नेकनूरमध्ये सद्भावना

नेकनूर भागात एकमेकांच्या दुकानातून वस्तू खरेदी न करण्यापर्यंतची मानसिकता झाली होती. या गावात ही यात्रा थांबणार आहे. यात्रेत सर्व जातीची माणसे सहभागी होतीलच पण वंजारी आणि मराठा या दोन्ही जातींमधील प्रमुखांना बोलावण्यात आले आहे.

‘यात्रेत पक्षाचा झेंडा असणार नाही. सद्भावना ठेवा हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून व सेवा दलाचे ध्वजारोहण करुन एक हजार स्वयंसेवक या यात्रेत सहभागी होणार आहेत. सर्व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे. या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. जातीय ताण दूर व्हावा यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज ओळखून हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. – राहुल सोनवणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष