सोनिया व राहुल गांधी यांच्या सल्लागारांनी चुकीचा सल्ला दिल्यामुळेच देशात व राज्यात काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली, असे मत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ात केलेल्या दुष्काळ पाहणीच्या पाश्र्वभूमीवर निलंगेकर यांनी खास पत्रकार परिषद घेऊन हे मत मांडले. गेल्या ३ महिन्यांपासून पाऊस नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता शेतकऱ्यांच्या मदतीचे निर्णय घ्यायला हवे होते. मागील काळात चारा छावणीत चुकीच्या गोष्टी घडल्या, असा आरोप त्यांनी केला होता. २००३-०४ मध्ये मी महसूलमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रात अतिशय चांगल्या चारा छावण्या चालवल्या. त्या कामाचे विरोधकांकडूनही कौतुक झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गावपातळीवर पैसेवारी काढून निर्णय घेतला पाहिजे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात. मात्र, लोकांना कृतीची गरज असल्याचे निलंगेकर म्हणाले. विजय पाटील निलंगेकर, जगन्नाथ पाटील, भरत गोरे या वेळी उपस्थित होते.
‘राणेंना कोणी बोलावले माहीत नाही’!
जिल्हय़ात तुमच्यासारखे नेतृत्व असताना कोकणातून नारायण राणे यांना का बोलावले गेले, या प्रश्नाला उत्तर देताना निलंगेकर यांनी ‘राणे यांना कोणी बोलावले होते हे मला माहिती नाही,’ असे म्हटले. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असले, तरी त्यांच्या एकटय़ाने पक्ष मजबूत होणार नाही. सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस व भाजप या दोन्ही राजवटीत काळा पसा वाढला. तो कमी करण्यासाठी दोन्ही सरकारांनी काही केले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा