उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे अनेक पुरातत्त्व मूर्ती आहेत. काही घरे बांधताना नवनवीन मूर्ती सापडत असल्याने या गावात उत्खनन करावे, अशी मागणी उस्मानाबाद पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी केली. औरंगाबाद पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक यांना निवेदन देऊन त्यांनी मूर्तीचे जतन करण्याची विनंती केली.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका यांच्या घराला वाघोली येथील रघुराम पाटील यांच्या जुन्या वाडय़ाची चौकट बसविली आहे. गावात प्राचीन बारव असून त्याचा भुयारी मार्ग महादेव मंदिराच्या िभतीपाशी निघतो. हेमाडपंथी मंदिर असून त्यात अनेक शिल्पे आहेत. गावातही अनेक ठिकाणी मूर्ती आहेत. या भागात अनेक भग्न मूर्ती असून शंख, चक्र, पद्म असलेल्या भगवान विष्णूची मूर्ती, तसेच कोरीव नक्षीदार महिरपही सापडली. या गावात विलक्षण सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे. तीन गर्भगृह असून या तिन्ही मंदिरास एकच सभामंडप आहे. दगडी चौकट व खांबावरही वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात गजलक्ष्मीची सुंदर मूर्तीही आहे. वाघोली गावाचा परिसर मोठा असून या भागात उत्खनन झाल्यास त्याचा पर्यटन विकासासाठी चांगला लाभ होईल, असे युवराज नळे यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग, परांडा, धाराशिव लेणी असा मोठा पुरातन ठेवा असल्याने या जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईडचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ते देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2015 रोजी प्रकाशित
‘मूर्तीचे जतन करण्यास वाघोलीत उत्खनन करावे’
वाघोली येथे अनेक पुरातत्त्व मूर्ती आहेत. घरे बांधताना नवनवीन मूर्ती सापडत असल्याने या गावात उत्खनन करावे, अशी मागणी युवराज नळे यांनी केली.
Written by दया ठोंबरे
First published on: 29-09-2015 at 01:50 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conservation of idol needed