लोकसत्ता विशेष प्रतिनधी
छत्रपती संभाजीनगर : धार्मिक उन्माद म्हणजे जणूकाही आपला धर्म आहे, अशी काहींची समजूत झाली आहे. त्यासाठी ते आपल्या सोयीनुसार दैवतांचा गैरवापर करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. संविधान त्यांना आपला खुळखुळा वाटू लागला आहे. त्याचा वापर आपल्या सोयीनुसार करण्याची परंपरा ते रुजवीत आहेत. संविधानाचे मंदिर बांधण्याची घोषणा केली आहे. पुढे कोणी तरी संविधान आरती आणि संविधान पुराण रचण्यासाठी पुढे येईल, अशी टीका विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी केली.
शहरातील आमखास मैदानावरील मलिक अंबर साहित्यनगरीत ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत कवी कंवर भारती यांच्या हस्ते करण्यात आले. भारताच्या नकाशाला मनुवादाच्या साखळदंडाने कुलूपबंद केले आहे. त्याची किल्ली संविधानामध्ये असल्याने त्या किल्ल्यांनी कुलूप उघडून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
राणा म्हणाले की, ‘क्लासिकल – मासिकल’ असा सांस्कृतिक संघर्ष जगभर आहे. यातील ‘क्लास’ हा शब्द वर्ग या अर्थाने येतो. वर्ग ही संज्ञा साम्यवादी तत्त्वज्ञानातील आहे आणि प्रामुख्याने वर्ग हा आर्थिक गट या अर्थाने वापरला जातो. प्रस्थापित वैदिकांच्या संस्कृतीने अवैदिक संस्कृतीतील असुर, राक्षस, दैत्य, दानव, पिशाच या शब्दांचे अर्थ विकृत करून टाकले आणि देव शब्दाचा अर्थ चांगला केला. त्याचे उदात्तीकरण झाले. वास्तविक देव हा आर्यांमधील चतुर वर्ग होता. त्यांनी स्वत:ला उच्च ठरवून भारतातील मूलनिवासी लोकांना हीन लेखले. त्याचा संघर्ष वैदिक आणि पौराणिक साहित्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. या क्लासिकल आणि मासिकल संघर्षाची दखल साहित्याने घ्यायला हवी. त्यासाठी साहित्यिकांनी मिथकांच्या चिकित्सेसाठी पुढे यायला हवे.
सातवाहनकालीन नागवंशीय, पैठणमधील एकनाथांना बहिष्कृत करण्याचा प्रसंग आणि ब्राह्मण याचे दाखले देत राणा यांनी विद्रोही साहित्यात ‘गंगा – जमुना तहजीब’ जिवंत ठेवण्यासाठी सावध राहावे, अशी भूमिका मांडली.
या वेळी माजी अध्यक्ष वासुदेव मुलाटे, विद्रोही साहित्य चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रतिमा परदेशी यांचेही भाषण झाले. शाहीर गणेश शिंदे यांनी साहित्य संमेलनाचे गीत म्हटले. व्यासपीठावर उर्दू साहित्यिक नुरुल हसनैन, प्रल्हाद लुलेकर, प्रतिभा अहिरे यांची उपस्थिती होती. साहित्यनगरीमध्ये विविध पुस्तकांची दालनेही उभारण्यात आली होती.