वैजापूरच्या शासकीय गोदामातील माथाडी कामगारांचा थकित पगार माथाडी मंडळात जमा करण्याचा निर्णय तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतल्यानंतरच माथाडी कामगारांनी मंगळवारपासून सुरू केलेले सहकुटुंब बेमुदत उपोषण मागे घेतले. मराठवाडा लेबर युनियनतर्फे हे उपोषण करण्यात आले.
माथाडी कायद्यानुसार राजकीय गोदामातील माथाडी कामगारांसह सर्वाचा पगार व लेव्ही दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत माथाडी मंडळात भरणे बंधनकारक असताना शासकीय गोदामांचे कंत्राटदार पगाराचे वाटप रोखीने करत होते.
रोखीने पगाराचे वाटप करणे हे माथाडी कायद्याचे उल्लंघन असल्याने माथाडी मंडळाने रोखीने पगार घेता कामा नये, असे वैजापूर शासकीय गोदामातील माथाडी कामगारांना सांगितल्यावर त्यांचा दोन महिन्याचा पगार थकला होता, म्हणून बेमुदत उपोषण करावे लागल्याचे मराठवाडा लेबर युनियनचे चिटणीस देवीदास कीर्तीशाह यांनी सांगितले. तहसीलदार डॉ. पडघम यांनी हमाल-कष्टकऱ्यांचे नेते सुभाष लोमटे व कंत्राटदाराची बैठक घेतल्यानंतर माथाडी कामगारांचा पगार व लेव्ही माथाडी मंडळात भरण्यासंबंधी निर्णय झाला व उपोषण मागे घेण्यात आले.