बीबी का मकबरा परिसरातील वादग्रस्त जागेबाबतची सर्व कागदपत्रे तपासण्याबाबत आíथक गुन्हा शाखेने पत्र दिल्यानंतर महसूल विभागातील कागदपत्रांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. यातील पहिली नोंद १९५७ची असल्याचे तहसीलदार रमेश मुनलोड यांनी सांगितले. पोलिसांनी मागणी केलेली सर्व कागदपत्रे त्यांना दिली जातील. फेरफाराच्या अनुषंगाने ७० नोंदी असल्याचे दिसून आले, मात्र सगळी नोंद दिल्यास ५० हजारांहून अधिक कागदपत्रे पोलिसांना तपासावी लागणार आहेत. दरम्यान, या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्याची घाई करण्याऐवजी सर्व पुरावे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न होतील. आरोपींना पकडले जाईलच, मात्र पुढे ते सुटू नयेत, अशी रणनीती आखली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी नगरसेवक राजू तनवाणी व राज आहुजा या दोघांवर गुन्हे दाखल असून, ते फरारी आहेत. या दोघांना पोलीस किती दिवसांत शोधतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. नेत्यांना अटक करताना पोलीस चालढकल करीत असल्याची ओरड सुरू झाली असली, तरी पोलिसांनी मात्र कागदपत्री पुरावे हुडकण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, शहरातील ९९/१ व ९९/२मधील भूखंड व्यवहारात अनेक राजकीय नेते अडकले असल्याने पोलीस दबावात काम करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. या अनुषंगाने महसूल विभागाने तहसीलदार रमेश मुनलोड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल दोन दिवसांत दिला जाण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षण क्रमांकातील नोंदी १९५७पासूनच्या आहेत. याच वर्षांत गहाणखत झाल्याचे सांगितले जाते. पोलिसांना सर्व सहकार्य केले जाईल, मात्र फेरफारावरील नोंदी आधी देऊ. नंतर सर्व कागदपत्रे दिली जातील, असे तहसीलदार मुनलोड यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रकरण जमिनीचे असल्याने पुरावे गोळा केले जातील, असे म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा