छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थी संघटनांमधील वादाने मंगळवारी टोक गाठले. एका विद्यार्थी नेत्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सचिन निकम या विद्यार्थी नेत्याला ताब्यात घेतले. या प्रकारानंतर विद्यापीठाला छावणीचे स्वरूप आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सरकार कठोर, जरांगेंची माघार! उपोषण समाप्त; तीन जिल्ह्यांत जाळपोळ, मराठा आंदोलकांवर गुन्हे

सुमारे शंभरच्या आसपास पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा विद्यापीठात दाखल झाल्या. हे प्रशासकीय इमारतीसमोरचे चित्र होते तर विद्यापीठात अधिसभा बैठकीतही अध्यासन केंद्रासाठी ९० लाखांची तरतूद असताना खर्च केवळ एक-सव्वा लाख होत असल्यावरून अधिसभा सदस्यांनी कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिवांना स्पष्टीकरण मागण्यासाठी धारेवर धरले. एकूण विद्यापीठात आत-बाहेर वादंगच दिसून आले. ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या दिवशी काही तरुण भगवे उपरणे घालून विद्यापीठात तरुण-तरुणींना धमकावत असल्याचे एक चित्र समोर आले होते. विद्यार्थी संघटनांनी धमकावणारे तरुण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून, संघ परिवाराशी संबंधित या संघटनेच्या तरुणांमुळे विद्यापीठात दहशत माजवली जात असल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून तेव्हा करण्यात आला. त्या निषेधार्थ कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनही केले होते.

हेही वाचा >>> Maharashtra Budget session 2024: जुन्या निवृत्तिवेतन योजनेची प्रतीक्षाच

कुलगुरू या सर्व प्रकाराबाबत अगदीच अनभिज्ञ आहेत, असे नसून त्यांच्यासमोरच हे सर्व चालले असल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मौन राखले व त्यांच्या दालनासमोर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातून विद्यार्थी संघटनांमधील वाद वाढत गेला. सोमवारी संघाच्या दक्ष उभे राहण्याच्या कृतीतूनही कुलगुरूंना उपरोधिक नमन करण्याचा प्रकार घडला आणि मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा मराठवाडा प्रमुख सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. अखेर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी कुलगुरू व विद्यार्थी नेत्यांशी संवाद साधून चर्चा घडवून आणली. कुलगुरूंनी मागण्या मान्य केल्याचे सांगितल्याने वादावर तूर्त पडदा पडला असल्याचे विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy between vice chancellor and student union in dr babasaheb ambedkar marathwada university zws