छत्रपती संभाजीनगर : मस्साजाेग येथील पवन उर्जा प्रकल्पाच्या साहित्य आगारात सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून व मारहाण करत ‘ आवादा’ कंपनीच्या पवनचक्कीतून तांब्याच्या तारेची १२ लाख ८७ हजार रुपयांची चोरी करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान झाल्याची तक्रारी सुरक्षा रक्षक आकाश जाधव यांनी दिली. या चोरीमध्ये १४ जण सहभागी होते असे वर्णन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे. संतोष देशमुख यांची हत्या घडण्यापूर्वी ज्या प्रकल्पावर हाणामारी झाली होती, तिथेच हा चोरीचा प्रकार घडला आहे.
मस्साजोग येथील आवादा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे आकाश जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ११.४५ वाजता १४ लोक चालत आले. त्यांनी डोक्यावर टाेप्या घातल्या होत्या तर तोंडाला गमछा बांधला होता. या मंडळींना आकाश व त्याचे सहकारी भीमराव दुनघव यांनी हटकले. यातील हातात दांडके असणाऱ्या चार व्यक्तीने सुरक्षारक्षकास धमाकावले व मारहाण केली. यातील दोघेजण सडपातळ तर दोघेजण जाड होते. दोन्ही सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधले. पवनचक्कीमधील शिडीमध्ये जाऊन दोघांनी कटरच्या सहाय्याने २०७ मीटर रोटार केबल व ३४५ मीटरची स्टॅटर केबल व १३ मीटर अर्थिंग वायर कापली व ते घेऊन गेले. पहाटे चार वाजता स्वत:ला सोडवून घेतल्यानंतर ही माहिती सुरक्षारक्षकांनी पर्यवेक्षकांना दिली. गालफडे यांनी सुरक्षारक्षकासह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले, ‘घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. त्याचा तपास केला जात आहे.’