|| बिपीन देशपांडे
अनेकांची परवड, आधारही एकमेकांचाच
औरंगाबाद : अंधत्वाच्या न्यूनतेवर मात करत सारंग रेल्वेमध्ये बिस्किटे- शेंगदाणे विकायचा. करोना नियमांमुळे सारे विस्कटले. आता तो त्याच्या सासुरवाडीत जाऊन राहिला आहे. राज्यात अशा पाच-सात हजारांवर अंध व्यक्तींचे व्यवसाय करोनामुळे गेले आहेत. त्यांना ना बाहेर पडता येते ना घरातल्या घरात काही व्यवसाय करता येतो. टाळेबंदी आणि निर्बंधांमुळे त्यांच्यासमोरचे प्रश्न अधिक जटिल बनू लागले आहेत.
अंध व्यावसायिकास त्याची सर्व कामे स्पर्शातून करावी लागतात. करोना संसर्गात अंतर नियम हा प्रमुख भाग असल्याने त्यांचे व्यवहार ठप्प आहेत. यातील काही व्यक्तींवर त्यांच्या कुटुंबाचीही जबाबदारी होती. पण आता प्रश्न गंभीर बनल्याचे नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंड संघटनेचे अध्यक्ष मनोज सुरडकर यांनी सांगितले. तीन अंध व्यक्तींमागे एक डोळस अशी रचना करत विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देणाऱ्या या संघटनेतील काहीजण मदतीसाठी पुढे आले आहेत. राज्यात या संघटनेचे आठ हजार सदस्य आहेत. अंध आणि डोळस अशी संख्या दहा हजार. या संघटनेचे राज्य सचिव असलेले मनोज सुरडकर हे औरंगाबाद येथे म्हाडात नोकरीस असून काही जण महानगरपालिकेत दूरसंचार यंत्रणा परिकर्मी (ऑपरेटर) आहेत. अन्य अनेकांचे छोटे व्यवसाय आहेत. मात्र, सारंगसारख्या रेल्वे, बसस्टॅण्डवर साहित्य विक्री करणाऱ्यांची अवस्था करोनामध्ये अधिक वाईट झाली आहे.
मनोज सुरडकर यांनी सांगितले,की सध्या अंध व्यक्तींचे अतोनात हाल होत आहेत. करोनाकाळात स्पर्शावर बंधने आली आहेत. अंधांचे स्पर्शाशिवाय पानही हालत नाही. स्पर्शविरहित वावरणे हे शक्य नाही, असे सरकारच्या ध्यानी आणून दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सध्या रेल्वेमधून प्रवास करत बिस्किट पुडे विकणाऱ्या सारंगचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. पत्नी, एक लहान मुलगा, मुलगी, असा त्याचा परिवार आहे. अलिकडेच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत सारंगला भेंडा फॅक्टरीतील सासरवाडीत जाऊन राहावे लागत आहे.
आळंदीत शाळा, औरंगाबादेत अंध मुलींचा सांभाळ
नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंड संस्थेकडून आळंदीत अंध मुलींसाठी पहिली ते बारावीपर्यंतची शाळा चालवण्यात येते. तर औरंगाबादेत तापडिया क्लबच्या ठिकाणी मिळालेल्या जागेत १८ वर्षांवरील ३० मुलींचा सांभाळ केला जातो, असे राज्य सचिव मनोज सुरडकर यांनी सांगितले.
सर्वांशी संपर्कासाठी मोबाइल फोन हे साधन असून संवादक उपयोजनद्वारे (टॉक बॅक फिचर) प्रत्येकाच्या अडीअडचणींवर चर्चा करून त्यातून मार्ग काढत आहोत. दररोज सायंकाळी आम्ही संवाद साधतो. औरंगाबादेत चार-पाच जणांना करोनाचा संसर्ग झाला होता. सुदैवाने ते आता करोनामुक्त आहेत. अंधांसह इतर परिचितांशी संवाद साधून मदत उभी केली जाते. – मनोज सुरडकर, राज्य सचिव, नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंड.