औरंगाबाद शहरात गुरुवारी औरंगाबादची संख्या १८४ एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन करोनाचाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद शहरातील १३ वॉर्डात करोनाचे रुग्ण आढळत असून गुरुवारी नूर कॉलनी, कैलाशनगर, चिकलठाणा,  किलेअर्क, जय भीमनगर, असेफिया कॉलनी, बेगमपुरा या परिसरात रुग्ण आढळले आहेत.  पोलिसांनी विविध भागात बिनकामाचे फिरणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे आज  दुपारनंतर फारशी वर्दळ नव्हती.

कोविडच्या पाश्र्वभूमीवर ८१ कोटीचा निधी

दुपारनंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी करोना विषयक आढावा घेऊन पोलिसांनी ज्या भागात रुग्ण आहेत तिथे अधिक कडक टाळेबंदी करावी. दरम्यान, जिल्हा आराखडय़ातील ८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. औरंगाबादमधील शेंद्रा आणि वाळूज या दोन्ही औद्योगिक वसाहतींमधून उत्पादनाचा नवा आदर्श घडविण्याचा विचार आहे. तसे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून केले जात असल्याचेही सुषाष देसाई म्हणाले.

जिल्हा रुग्णालयातील दोघांना लागण

शहरातील चिकलठाणा भागात व मसनतपूर भागातील दोघेही जिल्हा रुग्णालयात काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता करोनाची बाधा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही झाल्याचे पुढे आले आहे. भवानीनगर वॉर्डातील दत्तनगरमधील वाहनचालकासही करोनाची लागण झाल्याने या सर्वाच्या संपर्कातील ७० जणांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती कोविड कार्यबल गटाच्या प्रमुख अ‍ॅड. अपर्णा थिटे यांनी दिली. परभणी येथून गारखेडा भागात आलेल्या व्यक्तीस शोधण्याचा दूरध्वनी परभणी प्रशासनाकडून आल्यानंतर इंदिरानगर भागात तिचा शोध घेण्यात आला. मात्र, तिचा शोध लागला नाही. मात्र, तिच्या संपर्कातील पाच जणांचेही विलगीकरण करण्यात आले.

संजयनगरमध्ये नवीन उद्रेकस्थळ

औरंगाबाद शहरात सकाळच्या सत्रात २१ रुग्णांची वाढ झाली होती. सायंकाळी पुन्हा ३३ रुग्णांची वाढ झाली. यामध्ये मुकुंदवाडी भागातील संजयनगरमध्ये १८ रुग्णांचा समावेश झाला. हे शहरातील  नवीन उद्रेकस्थळ बनू लागले आहे. याशिवाय करोना वॉर्डात काम न करणाऱ्या एका परिचारकासही लागण झाली आहे. सध्या बेगमपुरा येथे वास्तव्यास असणारा हा परिचारक मूळचा जालना येथली असून त्याच्या पत्नीने करोना वॉर्डात एक दिवस काम केले होते, मात्र तिच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला होता. त्यामुळे या व्यक्तीला लागण कोठून झाली याचा शोध घेणे सुरु आहे. विविध भागात रुग्ण सापडत असल्याने प्रशासनही हैराण झाले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona wrath grows in aurangabad abn