‘मराठीत सांगितलेलं समजत नाही, इंग्लिशमध्ये सांगू’, नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीचा डायलॉग औरंगाबादमध्ये नगरसेवकांनी थोडा उलट करुन सादर केल्याचे दिसतंय. त्यांनी इंग्रजीमधील अहवाल समजत नाही, तो मातृभाषेतच द्या, अशी मागणी केली. भूमिगत गटार योजनेसंदर्भात स्थायी समितीत इंग्रजीत अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालावर शिवसेना, भाजप आणि एमआयएमच्या नगरसेकांनी आक्षेप घेतला. शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांना हा अहवाल मराठीत हवा आहे, तर तर दुसरीकडे एमआयएम नगरसेवक हा अहवाल उर्दूत सादर करण्याची मागणी करत आहेत.
औरंगाबाद महापालिकेने भूमिगत गटार योजनेसंदर्भातील ऑडिट अहवाल इंग्रजीमध्ये सादर केला आहे. तो समजत नसल्याचे सांगत नगरसेवकांनी हा अहवाल मराठी आणि उर्दू भाषेत भाषांतर करून द्यावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली. शहरात राबवल्या जात असलेल्या भूमिगत गटार योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे नगरसेवकांच्या मागणी नंतर योजनेचं तांत्रिक आणि आर्थिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रशासनाकडून स्थायी समितीमधील सदस्यांना याबाबतचा अहवाल सादर केला. मात्र, तो इंग्रजीमध्ये असल्याने नगरसेवकांची अडचण झाली. ही अडचण नगरसेवकांनी स्थायी सभेच्या बैठकीत बोलून दाखवली.