बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत विभागाने गजाआड केलेल्या डॉ. सुभाष मोरताळे याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चक्क जिल्हा रुग्णालयातच ओली पार्टी केली! मोरताळेवर उपचार करीत असल्याचा बहाणा करून बंद खोलीत हे रंग उधळले गेले. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत याची नोंद करण्यात आली. लाचखोरी प्रकरणात गजाआड केल्यानंतरही उपचाराच्या नावाखाली लाचखोर करीत असलेला स्वैराचार या निमित्ताने चव्हाटय़ावर आला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोपी यांचे स्नेहपूर्ण संबंध उजेडात आले आहेत.
लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संपत्तीच्या चौकशीदरम्यान तेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक (वर्ग १) डॉ. सुभाष मोरताळे याच्याकडे उत्पन्नापेक्षा २२ टक्के अधिक अपसंपदा असल्याचे समोर आले. त्यानंतर मोरताळेसह औषधी दुकानदार, वकील व स्टॅम्प विक्रेता अशा चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतील ११ पथकांनी छापे टाकून मोरतळेची ९बँक खाती, लॉकर्स, घर, नोकरीच्या उत्पन्नाची मोजदाद सुरू केली.
मात्र, ताब्यात घेतल्यावर मोरताळे रक्तदाबाचा त्रास असल्याचा बहाणा करीत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला. दरम्यान, मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास मोरताळेचा मित्र डॉ. प्रवीणकुमार इंगळे व भावेश वल्लभदास हे मद्याच्या बाटल्या घेऊन दवाखान्यात दाखल झाले. तेथे गार्डरूमवर तनात असलेला हेडकॉन्स्टेबल सोनटक्के याने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एम. शेख यांना या बाबत माहिती दिली.
कर्तव्यावर असलेले डॉ. सतीश आदटराव व डॉ. रणजित कदम यांनाही उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची माहिती दिली. दरम्यान रात्री अडीचच्या सुमारास पोलीस निरीक्षक शेख यांनी जिल्हा रुग्णालयात समक्ष भेट देऊन कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डी. के. पाटील यांना समक्ष बोलावून कळवले. या बरोबरच भ्रमणध्वनीवरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांना माहिती दिली. कर्तव्यावर नसताना डॉ. इंगळे याने मोरताळे याच्यावर उपचार करतो, असा खोटा बनाव करून ही ओली पार्टी केल्याचे समोर आले. दरम्यान, डॉ. इंगळेने या वेळी कॉन्स्टेबल सोनटक्के यांच्याशी हुज्जत घातली. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
जिल्हा रुग्णालयात डॉ. सुभाष माधवराव मोरताळे याने कार्यरत असताना २४ एप्रिल २०१० रोजी तक्रारदाराच्या मुलाच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम घेत असताना लाचलुचपतच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. मोरताळे तेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. मोरतळे याची अनेक ठिकाणी बेहिशेबी मालमत्ता आहे. सरकारला खोटे उत्पन्न प्रमाणपत्र दाखवून मोरतळे याने वेगवेगळ्या मार्गाने कोटय़वधींची मालमत्ता जमा केली.
उस्मानाबाद, लातूर, जालना, बीड व औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाच्या ११ पथकांनी मंगळवारी दिवसभर मोरताळेच्या बेहिशेबी मालमत्तेचा छडा लावला. मोरताळे याचे लातूर शहरात अॅक्सिडेंट हॉस्पिटल व घर, उदगीर तालुक्यातील मोरताळवाडी येथे घर, तेर ग्रामीण रुग्णालयात नोकरी व घर, तसेच नऊ बँक खाती आणि दोन बँक लॉकरवर पथकाने छापे टाकून मालमत्तेची कागदपत्रे, रोकड जप्त केली. मोरताळे याने त्याचे खोटे उत्पन्न प्रमाणपत्र दाखवले. परंतु यास जबाबदार असलेल्या अॅड. वसंत आडे याच्यासह खोटा करारनामा करणारा औषधी दुकानदार संजय देशखैरे व सुरेंद्र दळवे यालाही एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

Story img Loader