औरंगाबाद : दुष्काळी परिस्थिती आणि कापसावर पडलेली बोंडअळी यामुळे कापूस उत्पन्नात घट होईल, असा कृषी विभागाचा अंदाज असला, तरी भारतीय कापूस निगमच्या अधिकाऱ्यांना मात्र त्यांच्या कापूस खरेदीत फारशी घट होणार नाही, असे वाटते आहे. याही वर्षी राज्यातून ८० ते ८५ लाख गाठी कापूस खरेदी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारणत: एका गाठीमध्ये १७०-१७५ किलो कापूस असतो. या वर्षी मध्यम सुताच्या कापसाला पाच हजार १५० रुपये तर अधिक लांबीचे सूत देणाऱ्या कापसाला पाच हजार ४५० रुपये किमान हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. कामगंध सापळे आणि कीड रोखण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे मराठवाडय़ातून होणारी कापसाची खरेदी फारशी घटणार नाही, असे सांगितले जात असले, तरी वस्तुस्थिती मात्र काहीशी वेगळीच दिसून येत आहे. काही जिल्ह्य़ांमध्ये पाऊस नसल्यामुळे कापसाच्या उत्पन्नात निम्म्याला निम्मी घट होईल, असे मानले जाते.

मराठवाडा व खान्देशातून  २०१५-१६ मध्ये २८ हजार ५०० गाठी कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर कापूस सरकारी केंद्रात विक्री करण्याची प्रक्रिया वाढत गेली. कारण शेतकऱ्यांना व्यापारी पाडून भाव मागायचे. २०१६-१७ मध्ये ४९ हजार गाठी तर २०१७-१८ मध्ये ६४ हजार गाठी सीसीआयला खरेदी कराव्या लागल्या. या वर्षी मराठवाडा व खान्देशात कापूस खरेदीची ३२ केंद्र सुरू करण्याची तयारी सरकारी यंत्रणांनी सुरू केली आहे. राज्यात ही संख्या सुमारे ६०पर्यंत जाईल. मात्र, उत्पादनातील घट लक्षात घेता किती कापूस खरेदी होईल, या विषयी शंका घेतल्या जात आहेत.

मराठवाडय़ात १७.६६ लाख हेक्टरावर कापूसपेरा होत असतो. मात्र, बोंडअळीमुळे १६ लाख १० हजार हेक्टरावर कापूस लावला गेला. बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात कापसाचे मोठे क्षेत्र आहे. या तीन जिल्ह्य़ांत पावसाने हुलकावणी दिली असल्याने औरंगाबाद जिल्ह्य़ातील चार तालुक्यांत २३ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. जिरायत क्षेत्रावरील कापसाची वाढ खुंटली आहे.

लातूर जिल्ह्य़ातील अहमदपूर व जळकोट तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्य़ांमध्ये बोंडअळीसह रस शोषणाऱ्या अळ्याही आढळून आल्या आहेत. परिणामी कापूस किती हाती लागेल, याविषयी शंका असल्या तरी भारतीय कापूस निगममधील अधिकाऱ्यांना उत्पन्नात फारशी घट होणार नाही, असे अजूनही वाटत आहे. पाऊस झाला नाही तर मात्र उत्पादनात घट होईल, असे सांगितले जाते.