छत्रपती संभाजीनगर – एका अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्यासह तिच्या एका आजोबांनी व नात्यातीलच अल्पवयीन मुलाकडून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी वारंवार अत्याचार करणाऱ्या शेजाऱ्याला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि २६ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तर चाऊमिन खाऊ घालून नात असलेल्या पीडितेवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी गुरुवारी सुनावली.

हेही वाचा >>> सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांची सोलापुरात परिषद

या प्रकरणात १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने बिडकीन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानूसार, मे २०१८ मध्ये पीडितेच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या होत्या. पीडितेचे आई-वडील आणि दोन बहिणी या कामाला जात होत्या. त्यामुळे पीडिता ही एकटी घरी राहत होती. एके दिवशी शेजारीच राहणार्‍या विनोद (वय २४) (नाव बदलेले) याने पीडितेला घरी बोलावून अत्याचार केला. त्यानंतरही आरोपीने तिला धमकावत चार-पाच वेळी अत्याचार केला. त्यानंतर गावातच राहणार्‍या पीडितेचा नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलानेही तिच्या घरी येवून अत्याचार केला. त्यानंतर मे महिन्यातच पीडितेचा आजोबा शांताराम (वय ७९) (नाव बदलेले) यानेही अत्याचार केला.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक

पीडितेचे पोट दुखू लागल्यानंतर तिने घडलेल्या अत्याचाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी उपनिरीक्षक विठ्ठल आईटवार यांनी न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. खटल्यादरम्यानच पीडितेने एका मुलाला जन्म दिला. डीएनए तपासणी अहवालावरून शेजारी राहणारा आरोपी विनोद याच्याशी डीएनए जुळला. सुनावणीअंती न्यायालयाने विनोदला नैसर्गिक मृत्यूपर्यंत शिक्षा व २५ हजारांच्या दंडासह सुनावली. तर नराधम आजोबा शांताराम याला १० वर्षांचा कारावास, २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात उपनिरीक्षक एस.बी. वाघमारे, हवालदार एस.जी. घुगे आणि अंमलदार सनी खरात यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. अल्पवयीन मुलाविषयीचे प्रकरण बालन्यायालयात सुरू आहे.