छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारीपदाच्या ११४ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतील मुलाखती २६ ते २९ मार्च दरम्यान पूर्ण झाल्या. यामध्ये महाराष्ट्रातून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी प्रथम आली आहे. तर एकूण यादीतून निवडावयाच्या ११४ उमेदवारांधून ५८ उमेदवार या महिला प्रवर्गातील आहेत.
एमपीएससीकडून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी पदासाठी १९ मे २०२३ रोजी जाहिरात काढण्यात आली होती. १० हजार उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली होती. त्यातून मुख्य परीक्षेसाठी बाराशे उमेदवार पात्र ठरले. यातून ३४३ उमेदवार मुलाखतीसाठी निवडले गेले. त्यातून ३२३ उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. यामधून ५८ उमेदवार या महिला प्रवर्गातील असून, त्यांना दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारीपदावर नियुक्ती मिळणार आहे. तर याच पदावर ५६ पुरुष न्यायाधीश मिळणार आहेत.


८ ते १० तास अभ्यास दररोज आठ ते दहा तास अभ्यास सुरू ठेवला. त्यातही सातत्य ठेवले. याशिवाय केलेल्या अभ्यासाचा सराव करण्यावर (रिव्हिजन) अधिक भर देऊनच दिवाणी न्यायाधीशपदाच्या परीक्षेला सामोरे गेले. अभ्यासासोबतच त्याविषयाच्या अनुषंगाने वाचन, मनन, चिंतनही आवश्यक आहे. याच सूत्राला समोर ठेवून अभ्यास केला. त्याचा सरावही सुरूच ठेवले, असे या यशामागचे गमक या परीक्षेत राज्यातून प्रथम आलेली ऋचा कुलकर्णीने सांगितले. ऋचाने परीक्षेसाठीचे शिकवणीवर्ग पुण्यात पूर्ण केले. बीडमधील संस्कार विद्यालयातच दहावीपर्यंतचे, बारावी सावरकर कनिष्ठ महाविद्यालयातून तर विधि शाखेचे शिक्षण छत्रपती संभाजीनगरमधील माणिकचंद पहाडे महाविद्यालयात घेतले. ऋचाची आई बालवाडी शिक्षिका होती. तर वडील स्थानिक एका बँकेसाठी पैसे जमा करण्याचे (पिग्मी) काम करतात.