अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आलेल्या आवाहनास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची खरेदी करण्याऐवजी त्या पशातून पुस्तके, खेळणी व किल्ले बांधणीचे साहित्य खरेदी करण्याचा संकल्प जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थ्यांनी केला. फटाक्यावर खर्च होणारी ४९ लाख ४४ हजार ७०० रुपयांच्या रकमेची बचत या संकल्पामुळे झाली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान चालविले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून, आपल्या विवेकी कृतीतून विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन शहर व परिसरातील विविध शाळांमधून अंनिसच्यावतीने करण्यात आले. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, अपघाताने भाजणे, आग लागणे, वृद्ध, आजारी, परीक्षार्थी आदी घटकांना होणारा त्रास, फटाका उद्योगात होणारे बालकामगारांचे शोषण आदी बाबींची माहिती असणारे एक पत्रक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. यावर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र जाधव, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व सिनेकलावंत नाना पाटेकर आदींनी आवाहन केले. भारतीय जैन संघटनेच्यावतीने हे पत्रक प्रायोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या संकल्प पत्राच्या प्रती उस्मानाबाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एकत्रित करण्यात आल्या. जिल्ह्यातील ६० प्रशालांमधून २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी संकल्प पत्रं भरून यंदाच्या दिवाळीत फटाके व शोभेच्या दारुवर खर्च करण्यात येणारे सुमारे ५० लाख रुपये बचत करण्याचा संकल्प आपल्या पालकांच्या सहमतीने केला.
मागील २० वर्षांपासून परिवर्तन मंच आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने सुरू असलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.