मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे साडेतीन हजार रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे सात हजार रुपये, तसेच पकडलेले वाहन सोडण्याचे वेगळे तीन हजार अशी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्ह्य़ातील लिंबेजळगाव (तालुका गंगापूर) सज्जाचा तलाठी विनोद पद्माकर क्षीरसागर या लाचखोराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गंगापूर येथे चहाच्या टपरीवर गेल्या आठवडय़ात (२५ जानेवारी) ही कारवाई करण्यात आली होती.
यातील तक्रारदार लिंबेजळगावचे राहणारे असून, टेंभापुरी (जिल्हा औरंगाबाद) येथील जलसिंचन शाखेच्या शाखाधिकाऱ्याकडून टेंभापुरी मध्यम प्रकल्पातून मुरुम व गाळपेरा काढण्याची परवानगी त्यांनी घेतली आहे. त्यांच्या टिप्परमधून ते मुरुम वाहतूक करीत असताना २० जानेवारीला तलाठी क्षीरसागर याने त्यांचे वाहन थांबवून तुम्ही अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करीत आहात, असे सांगून हद्दीतून मुरुम वाहतूक करायची असल्यास १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार करताच लाचलुचपत विभागाने २५ जानेवारीला पडताळणी केली व लाच घेताना क्षीरसागर याला पकडले होते. त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader