मंठा नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस सदस्यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीची गंभीर दखल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली. काँग्रेसच्या पाचही सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी म्हटले आहे.
मंठा ही जिल्ह्य़ातील सर्वात मोठी नगरपंचायत असून अलीकडेच झालेल्या निवडणुकीत तेथे शिवसेनेचे ९, काँग्रेसचे ५ व भाजपचे ३ सदस्य निवडून आले. या पाश्र्वभूमीवर डोंगरे यांनी सांगितले की, काँग्रेस उमेदवाराने अर्ज दाखल करून स्वत:चे मत भाजप उमेदवारास देणे अतिशय चुकीचे आहे. तसेच याच उमेदवाराने उपाध्यक्षपदासाठीही उभे राहून भाजपची मते मिळविणेही काँग्रेसच्या दृष्टीने योग्य नाही. गेल्या २४ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. नगरपंचायतीतील पक्षाच्या गटनेत्याकडेही जिल्हा काँग्रेसने या संदर्भात विचारणा केली असून मंठा तालुकाध्यक्षांना विचारणा केली जाणार आहे. उमेदवारीसाठी पक्षाकडे विनंती करायची व निवडून आल्यावर भाजपसोबत हातमिळवणी करायची हा प्रकार अयोग्य आहे.
येत्या मंगळवारी (दि. ८) नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्ह्य़ातून अडीच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शेतक ऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार रुपये भाव द्यावा, पिकांच्या नुकसानीबद्दल हेक्टरी २५ हजार रुपये मदत करावी, भाजपने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे धनगर, तसेच मुस्लीम व मराठा समाजास तत्काळ आरक्षण मिळावे, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार त्याला दिलासा देण्यासाठी अयशस्वी ठरल्याचा आरोप डोंगरे यांनी केला.

Story img Loader