मृत झालेल्या पक्षाला जिवंत करण्यासाठी काही पक्ष दुष्काळाचा उपयोग करून घेत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. उद्या मराठवाडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होणाऱ्या जेल भरो आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे करणार आहेत. जालना, औरंगाबाद व उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ांत त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपमध्येही अस्वस्थता असल्याने रावसाहेब दानवे यांनीही पत्रकार बैठक घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली.
राज्य सरकार नजर आणेवारीची प्राथमिक आकडेवारी हाती आल्यानंतर लगेच दुष्काळ जाहीर करेल, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, सध्या सर्वच पक्षांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. नजर पैसेवारी आल्यानंतर लगेच ही कार्यवाही केली जाईल. खरे तर अंतिम पैसेवारी जानेवारीत जाहीर होते. त्यांनतर सर्व प्रक्रिया होत असतात. मात्र, आता त्याऐवजी प्राथमिक अंदाज हाती आल्यानंतर ही कार्यवाही होईल. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पक्ष वाढीसाठी दुष्काळाचा वापर करून घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला. या पत्रकार बैठकीत त्यांनी दुष्काळ पाहणी पथक येऊन गेल्याचेही सांगितले. ते पथक दुष्काळ पाहणी करून मदतीसाठी सरकारला शिफारस करणारे नव्हते तर कायमस्वरुपी उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने अभ्यासाचे होते, असे लक्षात आणून दिल्यानंतर तशी माहिती आपल्याकडे नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणेच टाळले.
शिवसेनेने बिहारला मदत करता मग मराठवाडय़ाला का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते सत्तेत असताना दुष्काळ जाहीर करा, मदत द्या, अशी मागणी करत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की, या अनुषंगाने राजनाथ सिंग यांच्यासमवेत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अशी चर्चा झाली. त्या बैठकीत राजनाथ सिंग यांनी भरीव मदत देण्याचे मान्य केल्याचेही दानवे म्हणाले.
भाजपची मदत अजूनही बैठकीतच
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या संघटना व पक्ष पुढाकार घेत आहेत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर शिवसेनेने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना १ कोटी रुपये रोख व तेवढय़ाच किमतीचे रेशन मदत म्हणून दिले. या पाश्र्वभूमीवर भाजप काय करणार, असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारला आणि त्यांनी पक्षीय पातळीवरची मदत करण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. मुख्यमंत्री जपान दौऱ्यावरून आल्यानंतर पक्षीय मदतीबाबतही निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यामुळे भाजपची मदत अजूनही बैठकीतच असल्याचे दिसून आले.

Story img Loader