नांदेड : लोहा तालुक्यातील घोटका या गावाच्या परिसरात दगडांच्या कपारीत लपलेली मगर वन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मोठ्या हिकमतीने पकडली. मुखेड येथे या मगरीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. हा भाग मुखेड वन परिक्षेत्रांतर्गत येतो. घोटका गावाच्या परिसरात मोठी मगर असल्याचा दूरध्वनी कंधार येथील वनकर्मचाऱ्यास मंगळवारी आला. या मगरीला पकडण्यासाठी कर्मचारी पाठवा, अशी विनंती दूरध्वनीद्वारे करण्यात आली होती. याबाबत उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्याशी तातडीने संपर्क साधून मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांनीही त्यातील गांभीर्य ओळखून आवश्यक सूचना केल्या.
वनपाल शंकर धोंडगे, वनसंरक्षक अरुण राठोड, शिवसांब घोडके, परमेश्वर टेकाळे, कय्युम शेख व सर्पमित्र सिद्धार्थ काळे आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांच्या मदतीने मगरीस पकडण्यात आले. त्यानंतर मगरीला शासकीय वाहनातून मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. डाॅ. मुर्कीकर यांनी यात पुढाकार घेत मगरीची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. सहायक वनसंरक्षक भीमसिंह राठोड, मुखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ, निखिल हिवरे यांनी संबंधितांना मार्गदर्शन केले. वनसंरक्षक धम्मपाल सोनकांबळे, लक्ष्मण पांडुरणे, शेख महेबुब, प्रभू राठोड, नदान शेख व ब्रह्मा राठोड यांनीही याकामी पुढाकार घेतला. मगरीला ती पूर्णपणे बरी झाल्याची खात्री करून अधिवास ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे मुखेड वन परिक्षेत्र कार्यालयातून सांगण्य़ात आले.