औरंगाबाद लाचलुचपतविरोधी विभागावर ९७ लाख रुपयांचे चलनओझे; न्यायालयांकडून मार्गदर्शन करण्याच्या सूचना
चलनतापामुळे सामान्यांच्या हतबलतेच्या कहाण्या देशभर थोडय़ाफार फरकाने सारख्याच आहेत. लाचलुचपतविरोधी विभागासमोर मात्र वेगळ्याच प्रकारचा तिढा निर्माण झाला आहे. कारवाईत पकडलेल्या ९७ लाख ८७ हजार ९१० रुपयांच्या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न औरंगाबाद विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. या समस्येबाबत नुकतीच औरंगाबाद विभागात चर्चा करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हय़ातील अधिकाऱ्यांनी न्यायालयास याबाबतचे पत्र देऊन मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचना दिल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी सांगितले.
जालना जिल्हय़ात एका लाच प्रकरणातील ८ लाखाच्या जुन्या नोटा आहेत. बहुतांश नोटा ५०० आणि हजार रुपयांच्या असल्याने त्याचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चिखलीकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर त्यांच्याकडे ३० कोटीहून अधिक रक्कम सापडली होती. ही रक्कमही न्यायालयाकडे जमा आहे. अशा कोटय़वधीच्या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.
औरंगाबाद विभागातील वेगवेगळय़ा प्रकरणात लाचेचा सापळा रचण्यासाठी ८२ लाख १५ हजार १७० रुपये वापरण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत औरंगाबादमधील एका प्रकरणात १५ लाख ७२ हजार ७४० रुपये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेले आहेत.
लाच घेणाऱ्याला ती देण्यासाठी या विभागाकडे सरकारकडून नोटाही दिल्या जातात. त्याला अॅन्थ्रासिन ही पावडर लावली जाते. ती लाच घेणाऱ्याच्या हाताला चिकटते. लाचेची रक्कम आणि लाच घेणाऱ्याचे हात याची विशिष्ट पद्धतीने छायाचित्रेही घेतली जातात. त्यानंतर होणारे पंचनामे व नोटा न्यायालयात पुरावा म्हणून सादर केल्या जातात. अशी ९७ लाख रुपयांची रक्कम असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद या चार जिल्हय़ांतच एवढी मोठी रक्कम अडकलेली आहे. नोटा बदलल्याने त्या परत करण्याची वेळ आली तर काय, हा प्रश्न अधिकाऱ्यांनाही संभ्रमात टाकणारा आहे. निर्दोष ठरणाऱ्या व्यक्तीला पुन्हा रक्कम द्यावी लागत असल्याने ती अनामत म्हणून ठेवण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख असताना प्रवीण दीक्षित यांनी घेतला होता. औरंगाबादच्या चार जिल्हय़ांमध्ये ही रक्कम एक कोटीपेक्षा अधिक आहे. न्यायालयीन कामांमध्ये पुरावा म्हणून वापरल्या जाणाऱ्या नोंटाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्रांगडे काय?
लाच घेताना पकडलेल्या नोटा न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या असतात. तसेच यातील नोटांना अॅन्थ्रासिन नावाची पावडर लावलेली असते. पकडण्यात आलेल्या लाचखोर व्यक्ती जर निर्दोष आढळून आल्या तर तो त्या पैशावर दावा करतो. ती रक्कम त्याला परत करावी लागते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर नोटा बदलून घ्यायच्या कशा, असा प्रश्न पडला आहे.