टँकरने पाणी विकत घेऊन पशुधन जगवणारे अडचणीत
बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>
एका जनावराला दिवसभरात १५० ते २०० लिटर पाणी लागते. त्यात संकरित गायीं या उष्ण प्रकृतीच्या. त्यांना अधिक पाण्याची गरज. गावात भीषण दुष्काळ. जनावरांनाही टँकरनेच पाणी मागवावे लागते. चारा, सुग्रास, सरकी अशा खाद्यांवर होणारा खर्च दिवसभरात जवळपास साडेतीन ते चार हजारांच्या आसपास. एवढा खर्च करूनही आता दूध उत्पादक सहकारी संघाने लिटरमागे पाच रुपये कमी केले आहेत. या दरामुळे दहा दिवसांत १२ हजार रुपयांचा फटका बसला. महिन्याचा हिशोब ३६ हजारांच्या नुकसानीतील आहे. आता काय करायचे, अशा हतबल स्वरात औरंगाबादजवळील आडगावचे दूध उत्पादक शेतकरी शिवा दसपुते सांगत होते.
आडगावातून दररोज औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला चार हजारांवर लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. डेअरीने आता लिटरमागे पाच रुपयांनी दर कमी केले आहेत. त्याचा फटका गावातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडय़ात भीषण दुष्काळ. जलसाठे जवळपास सगळीकडचेच आटलेले. दुधाचा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांपुढे तर पाण्याच्या संकटामुळे मोठीच अडचण निर्माण झाली आहे. पशुधन जगवण्यासाठी कराव्या लागलेल्या कसरतीबाबत शिवा दसपुते सांगत होते की, आपल्याकडे ४० लहान-मोठी जनावरे आहेत. त्यातील २० जनावरे दुभती. आडगावातून दररोज ४० ते ५० कॅन दूध जाते. एका कॅनमध्ये ४० लिटर दूध याप्रमाणे चार हजारांवर लिटरपेक्षा अधिक दूध डेअरीला जाते. मात्र दर आता कमी केले आहेत. कसलीही सूचनाही दिली नाही. त्यामुळे जनावरे कशी जगवावीत, असा प्रश्न पडला आहे.
अशोक लोखंडे, गणेश हाके सांगत होते, दूध उत्पादक शेतकरी गावात अनेक आहेत. काहींकडे संकरित गायी आहेत. या गायींची प्रकृती उष्ण असते. त्यामुळे त्यांना पिण्यासाठी जास्त पाणी लागते. शिवाय हिरवा चारा नाही. आहे तो कोरडा. त्यामुळेही तहानेचे प्रमाण अधिक असते. साधारण एक गाय किंवा दुभते जनावर दिवसभरात दीडशे ते दोनशे लिटर पाणी पिते. गावाजवळचा जलसाठा आटल्यामुळे जनावरे टँकरच्या पाण्यावर जगवले जात आहेत. एक टँकर ३५० ते ४०० रुपयांना आहे. त्यात दोन दिवस भागतात. तर दिवसभरात एक टन उसाचा चारा लागतो. सध्या तोच उपलब्ध आहे. त्यासाठी टनामागे २६०० ते २८०० रुपये मोजावे लागत आहेत. सुग्राससाठी १२०० रुपये, ढेपीसाठी ११०० तर सोयाबीन आदींसारख्या भुशावर आठवडाभरात साडेचार हजार रुपये लागतात.
पशुधन जगवण्यासाठी एवढा खर्च करूनही भाव मात्र १९ रुपये २५ पैसे लिटरने मिळाला. कसलीही सूचना न देता अचानक दर कमी केला. दर दहा दिवसाला विक्री केलेल्या दुधाचे पैसे मिळतात. कमी केलेल्या दरामुळे दहा दिवसाच्या पशांतून १२ हजार रुपयांचा फटका बसला. महिन्याकाठी ३६ हजार रुपयांचे नुकसान आता सोसावे लागणार आहे. माणसांचे तरी कसेही भागेल. पण जनावरांना कसे जगावावे, असा प्रश्न पशुधन मालकासमोर उभा आहे.
सरकारकडून अनुदान बंद
शेतकऱ्यांना दुधासाठी देण्यात येणारा दर हा सरकारी अनुदानातून दिला जातो. पण १ फेब्रुवारीपासून शासकीय अनुदान बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने पैसे अदा केले. लिटरमागे पाच रुपये कमी झाले.
– पी. बी. पाटील, सरव्यवस्थापक, औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघ.