छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात जातीय तेढ वाढत असल्याची चर्चा होत असताना प्रजासत्ताकदिनी दोन चांगली उदाहरणे समोर आली आहेत. नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एकमेकांना हाक मारताना कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पहिल्या नावाचाच वापर करावा, असे लेखी आदेश काढले आहेत. दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा-वंजारी समाजात निर्माण झालेला तेढ दूर करण्यासाठी मस्साजोगमध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा आरक्षण मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर बीड जिल्ह्यातील जातीय तणावास ‘मराठा विरुद्ध वंजारी’ असे स्वरूप असल्याची चर्चा सुरू होती. ओबीसी आणि मराठा एकमेकांविरोधात उभे ठाकावेत, असे प्रयत्नही काही गावांतून झाले. हे लोण पोलीस दलापर्यंत पसरले. हा चुकीचा पायंडा मोडीत काढण्यासाठी बीड पोलीस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अडनावाला प्राधान्य देऊ नये, असे लेखी आदेश देण्यात आले आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आग्रही असल्याचे कॉवत यांनीही स्पष्ट केले. या निर्णयाचे समाजातील विविध स्तरांतूनही स्वागत होत आहे. तर दुसरी चांगली घटना वादाचा केंद्रबिंदू असलेल्या मस्साजोगमध्ये घडली आहे. मराठा-वंजारी  समजात तेढ नसण्याचा संदेश देण्यासाठी बारगजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला. या निमित्ताने जातीचे राजकारण करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याचे मानले जात आहे.

अडनावामुळे जात आणि धर्म ओळखता येत असेल तर ती ओळख हळूहळू पुसावी लागेल. त्यामुळे पहिल्या नावाने संबोधन करावे, असे आम्ही ठरवले आहे. आम्ही असे वागलो तर समाजही त्याचे अनुकरण करेल.- नवनीत कॉवत, पोलीस अधीक्षक, बीड

देशमुख यांची हत्या करणारे ज्या जातीचे आहेत त्याच जातीचा मीही आहे. मारेकऱ्यांना जात नसते, गुन्हेगार गुन्हेगार असतात. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, हीच आमचीही मागणी आहे. – दत्ता बारगजे, सामाजिक कार्यकर्ते

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datta bargaje hoisted the flag in massajog to bridge the gap between the maratha and wanjari community amy