छत्रपती संभाजीनगर –  स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचा मार्ग पावसामुळे चिखलमय झालेला असताना आणि रस्ता मंजूर असतानाही तयार करण्यात येत नाही, याच्या निषेधार्थ एका ज्येष्ठ मृत व्यक्तीचा अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच करण्यात आला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे बुधवारी दुपारी घडली. या घटनेला दुजोरा देताना अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सांगितले की, यासंदर्भाने अद्याप तक्रार दाखल नसल्याने कुठलीही नोंद पोलीस दप्तरी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>> अंगणवाडी मदतनिसकडे पदोन्नतीसाठी ५० हजारांची मागणी; वैजापूरच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यासह शिपाई सापळ्यात

गोळेगाव ग्रामपंचायत ही सिल्लोड विधानसभा मतदार संघात येत असून येथील आमदार अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व अल्पसंख्याकमंत्री आहेत. सत्तार यांच्या मतदार संघातील अनेक गावांमधील स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ते नसल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. गोळेगाव येथील लक्ष्मण रायभान गव्हाणे (वय ७५) यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. परिसरात यापूर्वी झालेल्या पावसाने रस्ते चिखलमय झालेले आहेत. स्मशानभूमीच्या मार्गावरही चिखल झालेला असून अंत्यविधीला कसे जायचे, असा प्रश्न ग्रामस्थांंपुढे होता. काही ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्मशानभूमीसाठीचा रस्ता सातबारावर नोंद असून, दोनवेळा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरही रस्ता तयार करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ मृतांचे नातेवाईक व काही ग्रामस्थांनी मिळून मृतदेहच ग्रामपंचायतीसमोर आणून अंत्यविधी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Story img Loader