नापिकी व कर्जबाजारीपणाबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथे बलगाडीतून पाणी आणताना बलगाडीचा दांडा तुटल्याने पाण्याच्या टाकीखाली चिरडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.
उस्मानाबाद शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर धारूर हे छोटेखानी गाव आहे. जेमतेम पाच हजार लोकवस्तीच्या या गावात मागील दोन वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील पाणीसमस्येची भीषणता अंगावर शहारे उभे करते. दोन वर्षांत या गावात तीन पाणीबळी गेले आहेत. पाचवीला पूजलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थ आपापल्या पातळीवरच जिवावर उदार होऊन जीवघेणी धडपड करीत आहेत. ५५ वर्षीय उस्मान बशीर सय्यद दोन वर्षांपासून तीन किलोमीटर अंतरावरून दररोज बलगाडीतून पाणी आणत होते. कुटुंबातील १५ जणांची तहान भागविण्यासाठी त्यांची ही कसरत नित्याचीच झाली होती. मात्र, सोमवारचा दिवस त्यांच्यासाठी काळ ठरला.
सकाळी सातच्या सुमारास पाण्याची भरलेली टाकी बलगाडीतून घेऊन सय्यद घराकडे निघाले. चिखलाच्या ओबडधोबड रस्त्यावरून अर्धा किलोमीटर अंतर कसेबसे पार झाले. तोच बलगाडीचे चाक चिखलात रुतून बसले. जिवाच्या आकांताने बलांनी गाडी ओढण्याचा प्रयत्न केला. या चढाओढीत बलगाडीच्या तिन्ही दांडय़ा तुटून पडल्या. सय्यद यांचा तोल गेला. ते खाली चिखलात कोसळले आणि काही कळायच्या आत बलगाडीसकट पाण्याची टाकी त्यांच्या अंगावर कोसळली. बलगाडी आणि पाण्याच्या टाकीखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर सुमारे तासभर त्यांचा मृतदेह तेथेच चिखलात रुतून पडला होता. दूरवर रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना बलांची सुरू असलेली धडपड पाहून संशय आला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि एकच हंबरडा फोडला. गावात तीन िवधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे. भारनियमन आणि पाण्याची कमतरता त्यामुळे या परिसराला टंचाईचा शाप वर्षभर भोगावा लागत आहे. यापूर्वी सायकलवरून पाणी घेऊन जाणाऱ्या ग्रामस्थाला चारचाकी गाडीने धडक दिल्यामुळे, तर विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे दुसरा पाणीबळी गेला.
गावात केशेगाव साठवण तलावातून ७० लाख खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, दोन वर्षांपासून हा साठवण तलावच कोरडाठाक पडला. जिल्ह्यातील अनेक गावात सध्या भीषण दुष्काळाचे चटके बसत आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण अनेकांच्या जिवावर बेतली जात आहे. पाण्यामुळे आमच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. अन्य कोणाच्या वाटय़ाला तरी असे दुख येऊ नये, या साठी सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी उस्मान बशीर सय्यद यांच्या मुलाने केली, तर आमच्या तहानलेल्या चेहऱ्यावरून ओघळणारे अश्रूंचे पाट धोरणकर्त्यां सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत, हेच दुर्दैव असल्याची प्रतिक्रियाही उस्मान सय्यद यांच्या कुटुंबीयांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

Story img Loader