औरंगाबादच्या पर्यटनाला या वर्षी गळती लागली आहे. विदेशी व देशी दोन्ही पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ७७ हजार विदेशी पर्यटकांनी जिल्ह्यातील सहा पर्यटनस्थळांना भेटी दिल्या होत्या. ती संख्या आता ५१ हजार ७२२पर्यंत घसरली आहे. गेल्या वर्षभरात ‘२६/११’सारखी पर्यटनाला हानी हाईल, अशी एकही मोठी घटना घडली नसताना पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जागतिक दर्जाची ६ पर्यटनस्थळे आहेत. वेरुळ-अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, औरंगाबादच्या लेणी व पांडवलेणी या स्थळांवरील पर्यटक संख्येच्या नोंदी पुरातत्त्व खात्यामार्फत ठेवल्या जातात. या पर्यटनस्थळांवर विदेशी पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या तिकिटांवरून काढलेली संख्या पर्यटनक्षेत्राला गळती लागल्याचे सांगते. २०१४च्या डिसेंबपर्यंत अंजिठा लेणीस २४ हजार ३९८ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. या वर्षी ही संख्या १५ हजार ६६९पर्यंत खाली आली आहे.
केवळ विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली असे नाहीतर देशी पर्यटकही घटले आहेत. शहरासाठी आवश्यक ती दळणवळण सेवा हे या गळती मागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीवरून औरंगाबादला येण्यासाठी केवळ एकच रेल्वे आहे. सचखंड एक्सप्रेस वगळता थेट दिल्लीहून येणारी गाडीच नाही. विमान उड्डाणांची संख्याही कमालीची कमी आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील हॉटेलचालकांनी त्यांचे दरही वाढवले. शहरातील रस्त्यांची अवस्था तर राज्यभर गाजते आहे. सुविधांचा अभाव हे प्रमुख कारण असल्याने पर्यटनात घट होत असल्याचे सांगितले जाते.
औरंगाबाद शहरापासून जवळ असणाऱ्या वेरुळ लेणीकडे जाणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. पुढच्या काही दिवसांत शाळांच्या सहलीमुळे देशी पर्यटनात कदाचित वाढ होऊ शकेल. मात्र, विदेशी पर्यटकांना आकर्षति करण्यास महाराष्ट्र पर्यटन महामंडळ कमी पडत असल्याचे सांगितले जात आहे. या अनुषंगाने बोलताना या क्षेत्राच्या अभ्यासक दुलारी कुरेशी म्हणाल्या, की औरंगाबादच्या पर्यटनस्थळांची माहितीच दिली जात नाही. परदेशात शहराची माहिती देणाऱ्याबरोबरच उत्तर भारताची अधिक माहिती दिली जाते. केवळ तोंडी माहितीवर लोक येतात. जनजागृतीसाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. तसे होताना दिसत नाहीत.
औरंगाबादच्या पर्यटनाला गळती!
औरंगाबादच्या पर्यटनाला या वर्षी गळती लागली आहे. विदेशी व देशी दोन्ही पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ७७ हजार विदेशी पर्यटकांनी जिल्ह्यातील सहा पर्यटनस्थळांना भेटी दिल्या होत्या.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-01-2016 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decreased tourism in aurangabad