छत्रपती संभाजीनगर : महाराणा प्रतापांच्या पुतळ्याच्या अनावरणास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शहरात येत असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने शहरातील विविध चौकात कोरड्या घागरी बांधून आंदोलन करण्याचे ठरविले आहे. महिनाभर कार्यकर्त्यांना आंदोलनाचा कार्यक्रम हाती देत ‘लबाडांनो पाणी द्या’ असे घोषवाक्य लिहून शिवसेने आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सिडको परिसरात कार्यक्रमाच्या ठिकाणी आजपासूनच सुरक्षाविषयक तजवीज केली जात आहे.
शहराला दररोज २४० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून जायकवाडी धरणातून दररोज १५२ एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यापैकी शहराला रोज १४० एमएलडी पाणी मिळत आहे. मग संपूर्ण शहराला दोन दिवसाआड पाणी का मिळत नाही. हे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासकांना अपयश आले आहे. असा हल्लाबोल शिवसेना नेते, विरोधी पक्षेनते अंबादास दानवे यांनी केला. जनता पाण्यासाठी त्रस्त असताना महापालिका आयुक्त जी. श्रीकांत किक्रेटचा सामना पाहण्यात कसे रमले आहेत, असे म्हणत समाजमाध्यमावरून प्रश्न उपस्थित केले होते.
दानवे म्हणाले की, शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणी योजना कधी पूर्ण होईल याच्याशी काही देणं-घेणं नाही. हे आंदोलन त्याच्यासाठी नाही. मागे काय झाले, कुणी काय केले या राजकीय वादातही आम्हाला जायचे नाही. सध्या शहरात दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. मनपा प्रशासक पाण्याचे नियोजन करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.
वर्षभरात फक्त २६ दिवस पाणी
मनपा पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबविते, नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी वसूलही केली जाते. त्याबदल्यात शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करणे बंधनकारक असतानाही मनपाकडून १२ महिन्यांत फक्त २६ दिवस पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पाणीपुरवठा केलेल्या महिनाभराचीच पाणीपट्टी प्रशासक वसूल करतील का, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
शहराचे प्रवेशद्वार असलेले बाबा पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन, मुकुंदवाडी, हर्सूल या ठिकाणी रिकाम्या हंड्यांचे तोरण सकाळी बांधले जाईल. रेल्वेस्टेशन येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित राहतील. तर मुकुंदवाडी येथे आंदोलनास उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.