शिवजयंतीच्या दिवशी पानगाव येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस नसीम खान, वर्षां गायकवाड, आमदार त्र्यंबक भिसे, अमित देशमुख, सतेज पाटील आदी उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन पानगाव हल्ल्यात जखमी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक युनूस शेख यांची विचारपूस केली. विखे म्हणाले, ‘पानगावच्या घटनेत पोलिसांवर हल्ला करण्याचे धाडस लोकांचे व्हावे, यातच सरकारचे अपयश आहे. युनूस शेख यांनी आदल्या दिवशी समयसूचकता दाखवत झेंडा लावण्यापासून परावृत्त केले अन्यथा आणखी भयंकर प्रकार ओढवला असता. पानगावची गंभीर घटना उघडूनही पालकमंत्री अथवा गृहराज्यमंत्री यांनी या घटनेची दखलही घेतली नाही. हा असंवेदनशीलपणा धोक्याचा आहे.’
राज्यात कायदा, सुव्यवस्था राहिली नाही. इंदापूरमध्ये महिलेची विवस्त्र िधड काढण्यात आली. दररोज अनेक घटना घडत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांचा पदभार मुख्यमंत्र्यांकडे आहे. पोलीसच सुरक्षित नसतील तर जनतेने सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आम्ही सांगेल तो कायदा या पद्धतीने राज्यकारभार सुरू असून, असहिष्णुतेचे अनेक प्रकार घडत आहेत. पानगावच्या घटनेसंबंधी विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी आपण चर्चा करून घटनेची माहिती घेतली असल्याचे ते म्हणाले. पानगाव येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. या गावात २००२ सालापासून पोलीस चौकीची मागणी प्रलंबित आहे. पानगाव येथे पोलीस चौकीची मंजुरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader