छत्रपती संभाजीनगर – वाळू वाहतूक करताना पकडलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी सहायक महसूल अधिकारी तथा अव्वल कारकुनाने २ लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख १० हजार द्यायचे ठरल्यानंतर त्यातील ७० हजार रात्रीच स्वीकारले होते. उर्वरीत ४० हजारांपैकी ३० हजार रुपये स्वीकारताना अव्वल कारकुनास छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी पंचांसमक्ष पकडले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री पार पडली.
काशिनाथ आनंदा बिरकलवाड (वय ४१), असे लाच घेणाऱ्या अव्वल कारकुनाचे नाव आहे. हा कारकून उप विभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ९ एप्रिल रोजी रात्री संभाजीनगर परिसरात यातील तक्रारदारास त्याच्या हायवा ट्रकने वाळू वाहतूक करताना पकडले होते. त्यावेळी काशिनाथ बिरकलवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे कारवाई न करण्यासाठी प्रथम २ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १ लाख १० हजार रुपये मागणी करून ७० हजार रुपये रात्रीच स्वीकारले होते. तसेच उर्वरित ४० हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने येथील लाचलुचपात प्रतिबंधक विभागाकडे समक्ष हजर राहून तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी १० एप्रिल रोजी करून
लाच मागितल्याच्या अनुषंगाने गुरुवारी काशिनाथ बिरकलवाड यांच्याकडे तक्रारदार व पंचाला पाठवून लाच मागणी पडताळणी केली. काशिनाथ बिरकलवाड यांनी स्वतः करीता प्रथम ४० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपये लाच मागणी केली व आजच लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले. ३० हजार रुपये पंच क्रमांक १ यांचे समक्ष जालना रोडवरील रामगिरी हॉटेल समोर रंगेहात पकडले.
आरोपीच्या अंग झडती घेतली असता अंगझडतीमध्ये १ मोबाईल हॅंडसेट व रोख ७०० रुपये मिळुन आले. आरोपीची घरझडती सुरू आहे. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.