उधारीवर चालणारा कारभार बंद होण्याच्या मार्गावर माध्यान्ह भोजनातील धान्याव्यतिरिक्त इतर खर्चासाठी पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक मुलामागे ३.६७ पैसे आणि ६वी व ७वी ५.४६ पैसे तरतूद मिळते. मात्र, ही रक्कम वेळेवर मिळत नाही. ती रक्कम थकलेली आहेच. शिवाय खिशातून रक्कम टाकून काही करू इच्छिणारे शिक्षकही नोटाबंदीमुळे हतबल झाले आहेत.

निश्चलनीकरणानंतर शाळांमधील माध्यान्ह भोजनाच्या पौष्टिकतेमध्ये मोठा फरक पडू लागला आहे. शाळांमधील खिचडीमधून बटाटे, टोमॅटो, पालकाची भाजी टाकणे बंदच झाले आहे. विशेषत: खासगी शाळांमध्ये माध्यान्ह भोजनातील हा बदल आता विद्यार्थ्यांनाही लक्षात येऊ लागला आहे. आधीच वरणभात, मटकी व मुगाच्या आमटीबरोबर दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनासाठी भाजीवाल्यांना रोख रक्कम द्यावी लागे. काही दिवस उधारीवर चालणारा हा कारभार आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. अंगणवाडीमध्येही गूळ-शेंगदाण्याचा लाडू गायब झाला आहे. एक वेळचा नाश्ता आणि गरम खिचडीतील पोषणमूल्य कमी होऊ लागले आहे.

बीड शहराच्या एका टोकाला पूरग्रस्त कॉलनीतील प्रभातकार विद्यालयातील माध्यान्ह भोजनामध्ये पूर्वी बटाटे-टोमॅटो असायचे. या शाळेचे मुख्याध्यापक अंगतसिंग परेदशी म्हणाले, ‘खिचडी, वरणभात आणि उसळभात असा शाळेचा माध्यान्ह भोजनाचा मेन्यू ठरलेला आहे. सरकारकडून तांदूळ मिळतात. ते धान्य पुरेसे आहे. मात्र, तेल, मीठ, मिरची आणि खिचडीमध्ये भाजी टाकण्यासाठी आता रोख रक्कम बँकेतून मिळत नाही. भाजीवाल्याने काही दिवस उधार दिले. आता त्यालाही पैसे हवे आहेत. त्यामुळे भाज्या टाकण्याचे प्रमाण काहीसे कमी  झाले आहे.’ तरीही टोमॅटोचे भाव कमी असल्याने तशी फार अडचण जाणवत नाही.   अंगणवाडय़ांमध्येही पोषण आहार दिला जातो. २५० उष्मांक, १२ ग्रॅम प्रथिने मिळायलाच हवीत, असा दंडक आहे.

अंगणवाडीत शिजणारी खिचडीही मुले आवर्जून खातात. गेल्या काही दिवसांत भाज्यांमुळे अडचण जाणवत आहे. भाजी स्वस्त असली तरी ती उधारीवर घेण्याशिवाय पर्याय नाही. बचतगटाच्या महिला शेतकऱ्यांकडून भाज्या मिळवतात. पण गूळ-शेंगांचा लाडू मात्र गायब झाला आहे.

मोठय़ा प्रमाणात गूळ-शेंगदाणे बचतगटाला गावपातळीवर खरेदी करावे लागतात. अंगणवाडीची वेळ सर्वत्र दुपारी १ पर्यंतची आहे. नोटाबंदीनंतर पैसे आणायला जवळच्या बँक शाखेत जावे लागते. जेव्हा अंगणवाडी कार्यकर्त्यांना वेळ मिळतो तेव्हा बँका बंद झालेल्या असतात.

अनेकजणींकडे एटीएमही आहेत, पण त्या गावाहून शहरापर्यंत पोहोचेपर्यंत रक्कम संपलेली असते. परिणामी, खिचडीतील पोषणमूल्य कमी  झाले, असे कोणी म्हणले तरी ‘त्या अधिकाऱ्याला भागवून घ्या एवढी वेळ’ असे सांगितले जात आहे.

बीड शहराजवळील प्रभातकार विद्यालयात मुलांना शिकवणाऱ्या लक्ष्मी लखन शिंदे सांगत होत्या, आमच्या वस्तीमधील सर्व जण पिवळय़ा रेशनकार्डावर जगणारे आहेत. त्यामुळे मुले खिचडी संपवतात. आता त्यात काही वेळा भाजी नसेल तर त्यात शिक्षकांची चूक नाही. ते तरी भाजीवाल्यांना नोटा कोठून देणार?’ प्रत्येक जिल्हय़ात अशीच स्थिती असल्याचे अधिकारीही सांगत आहेत.

Story img Loader