छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये घटना बदला खोटे कथन तर होतेच, मराठा आंदोलकांनाही छुप्या पद्धतीने महाविकास आघाडीला मदत केली. सोयाबीन आणि कापसाच्या दराचा प्रश्न होता. पण अलिकडच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे नाराजीची तीव्रता कमी झाली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. येत्या काळात लाडकी बहीणीचे जेवढे मेळावे होतील त्यातून मतदान बदलेल, असा दावाही त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटना बदलाचे कथन खोटे होते हे आता कळू लागले आहे. याच काळात सोयाबीनचा दर कमी होता. निवडणुकीनंतर आता आयात शुल्कात वाढ केल्याने सोयाबीनचे दर आता ४५०० रुपयांवर गेले आहेत. ते पाच हजार रुपयांपर्यंत जातील. शिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी सोयाबीन कापूसाचे भाव कमी झाल्याने मंजूर केलेली भावंतर योजनेचे चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. दरही वाढत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा नाराजीची तीव्रता कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मेळाव्यातून हे दिसून येत आहे. पण भाजप कार्यकर्ताच अपराधबोधात वावरत आहेत. संवेदनशीलता हवी पण केलेले निर्णय सांगायला शिकले पाहिजे. जे निर्णय झाले नाहीत ते आम्हीच पूर्ण करू शकतो असा विश्वासही द्यायला हवा, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>>लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

ओबीसीतून आरक्षणाचे वचन लिहून घ्यावे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाईल असे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून जरांगे यांनी लिहून घ्यावे आणि त्यांना मदत करावी असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरक्षण प्रश्नी सर्व पक्षीय बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांचीही स्वाक्षरी असल्याचा कागद सरकारकडे असल्याचा दावा फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसमोर केला. ते खोटे कथन करतात. त्यांनी केलेल्या खोट्या नेरेटिव्हला भाजपचे कार्यकर्ते उत्तर देत नाहीत. १९८२ साली मराठा आरक्षण प्रश्न बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांची मागणी कॉग्रेस आणि शरद पवार यांनी कधी पूर्ण केली नाही. पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. पण ही मागणी भाजपने पूर्ण केली. आरक्षण टिकवले. त्यातून अनेकांना आता नोकऱ्या लागू लागल्या आहेत. तरी देखील घेतलेले निर्णय भाजपचे कार्यकर्ते सांगत नाहीत. आजही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ असे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याकडून लिहून घ्यावे आणि जरांगे यांनी मग त्यांना मदत करावी, असे फडणवीस म्हणाले. वेगवेगळे पक्ष घेत असलेल्या भूमिका पुन्हा ‘ एक्सपोज ’ केल्या जात आहेत. पुढेही हे काम होईल. पण शरद पवार हे नेहमी दुटप्पी भूमिका घेतात. ती बाब सर्व सामांन्यासमोर आणायला हवी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis claim regarding the unexpected result in the lok sabha amy