दोन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारने यंदा जिल्ह्याच्या पदरात निराशेचा जोगवा टाकला. रेल्वे अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या अपेक्षांना यंदाही थारा मिळाला नाही. सोलापूर-तुळजापूर-जळगाव मार्गाच्या पुर्णत्वासाठी वर्षांनुवष्रे प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व रेल्वे समित्यांना रेल्वेमंत्र्यांनी यंदाही ठेंगा दाखवला. कुठलीही भाडेवाढ न करता, रेल्वे डब्यांत व स्थानकांवर सुविधा देण्याची घोषणा करीत सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्गाची घोषणा यंदाही हवेत विरली.
विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापुरातील जाहीर सभेत दिलेले सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्गाचे आश्वासनही सलग दुसऱ्यांना फोल ठरले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी ५ वर्षांपासून मोठे प्रयत्न केले. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केंद्रीय रेल्वे समितीचे सदस्य असताना त्यांनी मराठवाडय़ास फायदेशीर ठरणारा सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्ग होण्यासाठी प्रयत्न केले. रेल्वे लोकआंदोलन समिती, तुळजापूर येथील रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानेही काँग्रेस सरकारकडे पाठपुरावा केला. मोदींकडून तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची घोषणा झाली. परंतु सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्ग पूर्णत्वासाठी रेल्वेमंत्र्यांनी यंदाही कसलीही तरतूद केली नाही.
रेल्वे संघर्ष समित्यांची घोर निराशा
सोलापूर-तुळजापूर-जळगाव मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. केवळ काम होणे बाकी आहे. सोलापूर-उस्मानाबाद-बीड-जालना-चिखली-बुलढाणा-मलकापूर व मुक्ताईनगर माग्रे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूपर्यंत मार्गाचेही सर्वेक्षण झाले. केवळ मलकापूर ते बऱ्हाणपूपर्यंतचे सर्वेक्षण बाकी आहे. हे सर्वेक्षण यंदा पूर्ण होईल आणि पुढील वर्षी रेल्वेमार्गाचे काम सुरू होईल. या अनुषंगाने मागील पाच वर्षांपासून तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती आणि रेल्वे लोक आंदोलन समिती प्रयत्न करीत आहे. रेल्वेमंत्री प्रभूंची दिल्लीत भेट घेऊन निवेदने देण्यात आली, सोलापूर रेल्वे विभागाकडेही या बाबत निवेदने देण्यात आली. मात्र, यंदाही अर्थसंकल्पात या बाबत कसलाही उल्लेख नसल्याने दोन्ही रेल्वे समित्यांची घोर निराशा झाली.
उस्मानाबाद रेल्वे स्थानकावरून एकूण १८ पॅसेंजर, एक्सप्रेस रेल्वेगाडय़ा ये-जा करतात. मिरज-परळी वैजीनाथ, लातूर-मुंबई, पंढरपूर-मिरज व मुंबई-लातूर या चारच दररोज ये-जा करणाऱ्या गाडय़ांना उस्मानाबाद स्थानकावर थांबा आहे. उर्वरित गाडय़ांना आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा थांबा आहे. रेल्वेस्थानक दोन प्लॅटफॉर्मचे असून मूलभूत सोयीसुविधा रेल्वे स्थानकावर नाहीत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, स्थानक स्वच्छतेसह, स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याचाही अभाव आहे.
पाठपुरावा सुरू ठेवणार – निपाणीकर
नियोजित दक्षिणोत्तर रेल्वेमार्गातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले. बीडहून जालना-चिखली रेल्वेमार्गाचे अनेक वेळा सर्वेक्षण झाले. तीन वर्षांपूर्वी चिखली-बुलढाणा-मलकापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले. आता मलकापूर ते बऱ्हाणपूरचे सर्वेक्षण बाकी आहे. या नियोजित रेल्वेमार्गाचे अंतर ४५० किलोमीटर आहे. परंतु सद्यस्थितीत सोलापूर ते कुर्डीवाडी-दौंड-नगर-मनमाड-भुसावळ आणि बऱ्हाणपूपर्यंतचे ७०० किलोमीटर आहे. मात्र, हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास या अंतरात घट होऊन तब्बल ३०० किलोमीटर अंतर कमी होणार आहे.
या मार्गावर सोलापूर, मराठवाडय़ातील तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब, केज, बीड, गेवराई, अंबड, जालना, विदर्भातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, बुलढाणा, मलकापूर व मुक्ताईनगर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आदी परिसरातील नामवंत बाजारपेठा, तीर्थक्षेत्र, पर्यटन, धार्मिकस्थळे, साखर कारखाने, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ आणि युवकांना रोजगार मिळणे सहज शक्य होणार आहे. त्यासाठी रेल्वे लोक आंदोलन समितीच्यावतीने सोलापूर क्षेत्र रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रभाकर निपाणीकर यांनी सांगितले.
लातूर-नांदेड व्हाया लोहा, नगर रेल्वेमार्ग होणार
लातूर-नांदेड व्हाया लोहा व नगर या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. सर्वेक्षणानंतर रेल्वेमार्गाचे तत्काळ काम पूर्ण करून चाचणी होणार आहे. बोधन-बिलोली-जळकोट-लातूर या नवीन मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. त्यामुळे काहीअंशी रेल्वेप्रवाशांचा प्रश्न भविष्यात सुटणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा