देवेंद्र फडणवीस अभ्यासू असून मुख्यमंत्रिपदावर चांगले काम करीत आहेत. आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहोत. त्यामुळे फडणवीस यांची जागा घेण्याची आपली इच्छा नाही, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल दानवे यांचा सपत्नीक भोकरदन येथे सत्कार करण्यात आला. या वेळी प्रास्ताविकात एका पदाधिकाऱ्याने दानवे मुख्यमंत्री होवोत, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, या पदाधिकाऱ्यास अप्रत्यक्ष फटकारताना दानवे यांनी वरील मत व्यक्त केले. सत्कारास उत्तर देताना ते म्हणाले, की भोकरदन व जाफराबाद तालुक्यांतील जनतेशी आपली नाळ जुळली असून ते पाठिशी असल्यामुळेच आतापर्यंत आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष अशी आपली वाटचाल झाली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे भोकरदन मतदारसंघात अडीचशे कोटींचा विकासनिधी आपण आणू शकलो.
जलयुक्त शिवार अभियान विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून भोकरदन व जाफराबाद तालुक्यांच्या प्रगतीसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कामांचा तपशील त्यांनी दिला. दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ाचा विकास झपाटय़ाने होत असल्याचे आमदार नारायण कुचे यांनी या वेळी सांगितले. आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन-जाफराबाद तालुक्यांच्या विकासासाठी हाती घेतलेल्या योजनांची माहिती दिली. सत्काराच्या कार्यक्रमापूर्वी खासदार दानवे यांची त्यांच्या निवासस्थानापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा